हरीश गुप्ता,
नवी दिल्ली-राज्यसभेवर नियुक्त झालेले सहा जण सोमवारी शपथ घेऊ शकले नाहीत. काहीशी विचित्र वाटणारी ही बाब प्रत्यक्ष घडली आहे. अधिकृत अधिसूचनाच न निघाल्याने असे घडले आहे. या सहा जणांची राज्यसभेवर नियुक्ती केली जात असल्याची फाईल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून गेल्या शुक्रवारीच मंजूर झाली परंतु त्यानंतर आवश्यक ती अधिसूचना निघाली नाही आणि सहाही जणांना शपथ घेता आली नाही.डॉ. सुब्रमण्यम स्वामी, नवज्योतसिंग सिद्धू, डॉ. नरेंद्र जाधव, मेरी कोम, सुरेश गोपी आणि स्वपन दास गुप्ता यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. स्वामी सोमवारी सकाळी पार्लमेंट हाऊसमध्ये आले आणि त्यांनी ते कधी शपथ घेऊ शकतील, हे विचारण्यासाठी थेट संसदीय कामकाज मंत्र्यांचे कार्यालय गाठले, असे समजते. तेथे त्यांना धक्काच बसला. ते कार्यालय अधिकृत अधिसूचनेचा शोध घेत होते. नंतर कार्यालयाने त्यांना अधिसूचना निश्चितच प्रक्रियेमध्ये असावी, असे सांगितले. शिक्षणतज्ज्ञ डॉ. जाधव हेदेखील संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात दिसले. राष्ट्रपतींनी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे सहा नावांना मंजुरी दिल्याची फाईल शुक्रवारी दुपारीच पाठविल्याचे स्पष्ट झाले आहे. गृह मंत्रालय गरज भासल्यास कायदा मंत्रालयाकडे ही फाईल पाठवते.या सहाही जणांना राजपत्रित अधिसूचना जारी करण्यात आलेली नाही, असे राज्यसभा सचिवालयाकडून सोमवारी सायंकाळपर्यंत अधिकृतरित्या कळविण्यात आलेले नव्हते. वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता तो म्हणाला की,‘‘सहा जणांच्या नियुक्तीची राष्ट्रपतींकडून पाठविण्यात आलेली फाईल गृह मंत्रालयाला शुक्रवारी रात्री आठनंतर मिळाली आणि सोमवारी सकाळी ती कायदा मंत्रालयाकडे पाठविण्यात आली. तेथे तिची प्रक्रिया दोन तासांत पूर्ण झाली.’’ काहीसा उशीर झाला होता परंतु या सगळ््यांची नियुक्ती झाली त्या दिवसापासून त्यांना खासदार मानले जाईल. शपथ घेण्याची तारीख ही त्यांच्या केवळ संसदीय कामकाजाशी संबंधित आहे, असेही हा अधिकारी म्हणाला. पार्लमेंट हाऊसमध्ये खासदारांना शपथ घेण्यासाठी ताटकळत ठेवण्यात आले आणि त्यांना याबाबत नेमकी प्रक्रिया काय आहे हे कोणीही सांगायला नव्हते. इतर सदस्यांनाही अशाच परिस्थितीला तोंड द्यावे लागले का हे समजू शकले नाही.