निधीअभावी अडले आमदार निधीचे प्रस्ताव
By admin | Published: December 20, 2014 10:28 PM
नागपूर: मागील सत्रातील आमदारांचा निधी पूर्ण खर्च झाला असून नवनिर्वाचित आमदारांना अद्याप निधी प्राप्त झाला नाही. त्यामुळे त्यांच्याकडून देण्यात आलेल्या विविध विकास कामांवरील प्रस्तावावर अंंमल थांबला आहे.
नागपूर: मागील सत्रातील आमदारांचा निधी पूर्ण खर्च झाला असून नवनिर्वाचित आमदारांना अद्याप निधी प्राप्त झाला नाही. त्यामुळे त्यांच्याकडून देण्यात आलेल्या विविध विकास कामांवरील प्रस्तावावर अंंमल थांबला आहे.दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आमदार निधीतून काही रक्कम वळती करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिल्याने यंदा आमदारांना किती निधी मिळतो याकडे लक्ष्य लागले आहे. मतदारसंघात विकास कामे करण्यासाठी आमदारांना दरवर्षी दोन कोटीचा विकास निधी मिळतो. अर्थसंकल्पात याची तरतूद करण्यात येते. यंदाचे निवडणूक वर्ष असल्याने निवडणुकीपूर्वी म्हणजे मार्च महिन्यातच जिल्ह्यातील सर्व आमदारांनी त्यांच्या निधीतील सर्व रकमेची कामे प्रस्तावित केली. त्याला तातडीने मंजुरीही मिळवून घेतली होती. त्यामुळे हा निधी खर्च झाला. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या व जिल्ह्यात १२ पैकी ५ आमदार प्रथमच विधानसभेवर निर्वाचित झाले आहेत. मात्र सध्या आमदार निधीच शिल्लक नसल्याने आमदारांनी दिलेले प्रस्ताव सध्या तरी थंडबस्त्यात पडून आहेत. या प्रकरणाचे पडसाद विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही उमटले. पहिल्या सहा महिन्यांसाठी नवीन सदस्यांसाठी ५० लाख तर जुन्या सदस्यांसाठी २५ लाख रुपयंाची तरतूद करण्याचे आश्वासन शासनाकडून देण्यात आले. मात्र ही प्रक्रिया पूर्ण होण्यास अवधी लागणार आहे. निधी आल्यावरच आमदारांनी दिलेले प्रस्ताव मार्गी लागण्याची शक्यता आहे. खासदार निधीतून सहा कोटींचे प्रस्ताव!नागपूर जिल्ह्यातील लोकसभेचे दोन सदस्य अनुक्रमे नितीन गडकरी आणि कृपाल तुमाने यांनी सरासरी सहा कोटीच्या कामांचे प्रस्ताव सादर केले आहेत. त्यात गडकरींकडून ३.५० कोटी तर तुमाने यांच्याकडून सुचविलेल्या २.५० कोटींच्या प्रस्तावांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)