नवी दिल्ली :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) अध्यक्ष शरद पवार यांची उद्योगपती गौतम अदानी यांच्याबद्दल विरोधी पक्षांशी मतभिन्नता असू शकते; परंतु, उद्योगपतीशी त्यांची मैत्री सुमारे दोन दशकांपूर्वीची आहे, जेव्हा गौतम अदानी उद्योगात विस्ताराच्या संधी शोधत होते.
२०१५ मध्ये मराठीत प्रकाशित झालेल्या ‘लोक माझे सांगाती’ या पवार यांच्या आत्मचरित्रात त्यांनी अदानी यांचे कौतुक केले होते. पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठे काहीतरी करण्याची महत्त्वाकांक्षा असलेले कष्टशील, साधे, विनम्र असे त्यांचे वर्णन केले आहे.
आपल्या सांगण्यावरूनच अदानींनी औष्णिक ऊर्जा क्षेत्रात पाऊल टाकले, असेही पवार यांनी पुस्तकात लिहिले आहे. मुंबई लोकल रेल्वेत सेल्समन म्हणून सुरुवात करून अदानींनी आपले अफाट व्यावसायिक साम्राज्य कसे उभे केले याचाही उल्लेख पुस्तकात आहे. ते लिहितात, “ते हिऱ्यांच्या व्यवसायात चांगली कमाई करत होते; पण गौतम यांना त्यात रस नव्हता. पायाभूत सुविधा क्षेत्रात पदार्पण करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. गुजरातचे मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते, असे त्यांनी म्हटले आहे.अदानी समूहाचा चिनी कंपनीशी संबंध : काँग्रेस- काँग्रेसने रविवारी केंद्र सरकारला लक्ष्य केले आणि अदानी समूहाच्या कथित चिनी संबंधांकडे लक्ष वेधले. तसेच या समूहाला अजूनही भारतात बंदर चालवण्याची परवानगी का दिली जात आहे, असा सवाल केला. जयराम रमेश यांनी एका मीडिया रिपोर्टचा हवाला दिला. - ते म्हणाले की, सरकारने २०२२ मध्ये एपीएम टर्मिनल्स मॅनेजमेंट आणि ताइवानच्या ‘वान हाई लाइन्स’च्या कन्सोर्टियमला सुरक्षा मंजुरी नाकारली होती. कारण विविध एजन्सींना वान हाईचे संचालक आणि एका चिनी कंपनीत संबंध असल्याचे दिसून आले होते. सुरक्षा मंजुरी न मिळाल्याने कन्सोर्टियम जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणातील एका बोलीत सहभागी होऊ शकला नाही.