मुंबई: कोविशील्ड लसीचं उत्पादन करणाऱ्या सीरम इन्सिट्यूट ऑफ इंडियाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबद्दलची माहिती दिली. कोविशील्ड लस घेऊन परदेशात अभ्यासासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अनिवार्य क्वारंटिनसाठी १० कोटींचा निधी सीरमकडून देण्यात येणार आहे.
अदर पूनावालांनी आज सकाळी एक ट्विट केलं. 'परदेशी जाणाऱ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, कोविशील्डची लस घेतलेल्यांना काही देशांमध्ये अद्याप थेट प्रवेश नाही. त्यांना क्वारंटिन अनिवार्य आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला काही खर्च करावा लागू शकतो. यासाठी मी १० कोटींचा निधी ठेवला आहे. तुम्हाला आवश्यकता असल्यास कृपया अर्ज करा,' असं पूनावालांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे.
ब्रिटननं आधी भारताचा समावेश रेड लिस्टमध्ये केला होता. मात्र आता ब्रिटननं भारताला एँबर लिस्टमध्ये ठेवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे भारतातून आलेल्यांना १० दिवस क्वारंटिन राहावं लागतं. रेड लिस्टमध्ये असताना इन्स्टिट्यूशनल क्वारंटिन अनिवार्य होतं. एँबर लिस्टमध्ये समावेश झाल्यानं आता घरी किंवा इतर ठिकाणी क्वारंटिन राहण्याची परवानगी आहे. ८ ऑगस्टपासून भारताचा समावेश एँबर लिस्टमध्ये होईल.
अमेरिका आणि युरोपियन युनियनमधून लसीचे दोन्ही डोस घेऊन आलेल्यांना ब्रिटनमध्ये थेट प्रवेश आहे. त्यांना क्वारंटिन नियमांमधून सूट देण्यात आली आहे. याशिवाय फायझर, मॉडर्ना, ऍस्ट्राझेनेका, जॉन्सन अँड जॉन्सनची कोरोना लस घेतलेल्यांना ब्रिटनमध्ये क्वारंटिन होण्याची गरज नाही.