ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात डीसीजीआयने दोन कोरोना प्रतिबंधात्मक लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत डीसीजीआयने ही माहिती दिली. डीसीजीआयचे संचालक व्ही.जी. सोमाणी यांनी सीरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या आपात्कालीन वापरासाठी परवानगी दिली. यानंतर सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी ट्वीट करत आपला आनंद व्यक्त केला.
"नव्या वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा. लस संकलनासाठी सीरम इन्स्टिट्यूटनं पत्करलेल्या सर्व जोखीमांनांतर अखेर यश मिळालं. करोनावर मात करणारी कोविशिल्ड ही पहिली लस असून तिच्या वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. ही लस सुरक्षित आणि परिणामकारक असून पुढील आठवड्यापासून ती देण्यास तयार आहे," असं ट्वीट अदर पुनावाला यांनी केलं. या ट्वीटसोबतच अदर पुनावाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, बिल गेट्स, केंद्रीय आरोग्य मंत्रालय, आयसीएमआर, ऑक्सफर्डसह अनेकांचे आभार मानले.