२ महिन्यात एकाच घरातील २ जवान शहीद! २६ वर्षीय जवानाला हौतात्म्य; ती 'माऊली' बेशुद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 07:12 PM2024-07-09T19:12:50+5:302024-07-09T19:16:24+5:30
दहशतवादी हल्ल्यात आदर्श नेगी शहीद झाल्याची बातमी कुटुंबीयांना रात्री समजली.
Kathua Terror Attack : जम्मू-काश्मीरमध्ये मागील काही दिवसांपासून सातत्याने जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक होत आहे. भारतमातेचे रक्षण करताना काही भारतीय जवानांना वीरमरणही आले. जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात उत्तराखंडमधील पाच जवान शहीद झाले. यातीलच एक नाव म्हणजे शहीद आदर्श नेगी. आदर्श हे टिहरी जिल्ह्यातील रहिवासी असून, त्यांच्या कुटुंबीयांवर दोन महिन्यांत दुसऱ्यांदा आभाळाएवढे संकट ओढावले आहे. आपला लेक या जगात नसल्याचे कानावर पडताच आदर्श नेगी यांची आई बेशुद्ध झाली. २६ वर्षीय आदर्श हे २०१८ साली गढवाल रायफलमध्ये भरती झाले होते. सहा वर्षे देशसेवा केल्यानंतर त्यांना वीरमरण आले.
आदर्श नेगी यांच्या कुटुंबातील एक सदस्य दोन महिन्यापूर्वी शहीद झाला आहे. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी आदर्श नेगी यांच्या मामाच्या मुलाने देशहितासाठी बलिदान दिले होते. ते भारतीय लष्करात मेजर म्हणून सेवा बजावत होते. त्यांच्या हौतात्म्याच्या जखमा ताज्या असताना आदर्श नेगी यांना हौतात्म्य आले. सोमवारी दुपारच्या सुमारास कठुआ शहरापासून १५० किमी अंतरावर लोहाई मल्हार येथील बदनोटा गावाजवळ माचेडी-किंडली-मल्हार रस्त्यावर लष्कराचे वाहन नियमित गस्तीवर होते. याच गाडीत आदर्श नेगीदेखील होते. अशातच दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले असून पाच जण जखमी झाले आहेत. हा संपूर्ण परिसर जम्मू विभागातील कठुआ जिल्ह्यात येतो.
दरम्यान, दहशतवादी हल्ल्यात आदर्श नेगी शहीद झाल्याची बातमी कुटुंबीयांना रात्री समजली. बातमी कानावर पडताच एकच खळबळ माजली. आदर्श यांची बातमी कळताच त्यांची आई बेशुद्ध झाली, तर वडिलांना मोठा धक्का बसला. आदर्श नेगी यांच्या पश्चात वडील दलबीर सिंह नेगी, आई, एक भाऊ आणि एक मोठी बहीण आहे. त्यांचा भाऊ चेन्नईत काम करतो, तर मोठी बहीण विवाहित आहे.