लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : निवडणूक जवळ आल्यानंतर बऱ्याचदा अनेक ठिकाणी मतदार यादीत घोळ झालेला पाहायला मिळतो. हिमाचल प्रदेशमधील ऊना जिल्ह्यातील हरोली विधानसभा मतदारसंघातील एकमेव नगरपंचायत असणाऱ्या टाहलीवालमध्येही असाच एक घोळ समोर आला आहे. काँग्रेसचे स्थानिक आमदार मुकेश अग्निहोत्री यांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त करीत मतदार यादीच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केला आहे.
आमदार मुकेश अग्निहोत्री यांनी आपल्या सोशल मीडियावरील अकाऊंटवरून पंचायतींच्या निवडणुकीसंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. तसेच काही फोटो शेअर करून निवडणुकींमध्ये काहीतरी घोळ असल्याचा आरोपदेखील केला आहे. अग्निहोत्री यांनी फेसबुकवर मतदार यादीचा फोटो शेअर करीत एकाच घराच्या पत्त्यावर तब्बल १०२ मतदारांचे ओळखपत्र बनविण्यात आल्याचा आरोप केला आहे. टाहलीवाल नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या या मतदार ओळखपत्रांमध्ये एकाच घराच्या पत्त्यावर दाखविण्यात आलेल्या मतदारांपैकी अनेकजण प्रवासी आहेत.