नवी दिल्ली : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर रुग्णाची ओळख लगेचच पटावी याकरिता याकरिता रेल्वे तिकीट आरक्षणाच्या फॉर्ममध्ये आता अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. आता प्रवाशाला तो कोणत्या रेल्वे स्थानकापर्यंत जाणार आहे इतकाच तपशील न लिहिता तो ज्या ठिकाणी जाणार आहे तिथला सविस्तर पत्ता फॉर्मवर लिहावा लागणार आहे. आयआरसीटीसीचे मोबाइल अॅप, आॅनलाइन किंवा काऊंटर अशा तीनपैकी कुठेही आरक्षण केले तरी ही माहिती द्यावी लागणार आहे.रेल्वे खात्याने यासंदर्भात म्हटले आहे की, रेल्वे प्रवाशांना आरक्षण फॉर्ममध्ये आता अधिक तपशीलवार माहिती द्यावी लागेल. प्रवाशाने पूर्वी आपल्याला जायचे असलेले ठिकाण किंवा त्या जिल्ह्याचे नाव लिहिले तरी काम भागत असे. पण आता प्रवाशाला त्याचा मोबाइल किंवा लँडलाइन फोन नंबर, जिथे जायचे आहे तिथला सविस्तर पत्ता, त्या जिल्ह्याचा पिनकोड क्रमांक, राज्याचे नाव, आपले ओळखपत्र क्रमांक अशी सारी माहिती तिकीट आरक्षण फॉर्ममध्ये लिहावी लागणार आहे. प्रवासात सोबत असणाऱ्या मोबाइल फोनचाच क्रमांक तिकीट आरक्षण फॉर्ममध्ये लिहिणे व मोबाइल फोनमध्ये आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणे अनिवार्य करण्यात आले आहे. आपल्या प्रवासाचा हेतू काय हेही या फॉर्ममध्ये लिहायचे आहे. जर प्रवाशाने माहिती नीट दिली नाही तर त्याला तिकीट देण्यात येणार नाही असे रेल्वेने म्हटले आहे.>सहप्रवासी कोण हेही कळणाररेल्वे प्रवासात एखादा कोरोनाचा रुग्ण आढळून आला तर त्याने कुठे कुठे प्रवास केला आहे व त्याच्या सोबत कोणी प्रवास केला याची खात्रीलायक माहिती मिळावी म्हणून तिकीट आरक्षण फॉर्ममध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे तो प्रवासी व त्याच्या संपर्कात आलेले लोक यांच्यावर त्वरित उपचार करणे शक्य होईल. त्याद्वारे कोरोना संसर्गाची साखळी तोडता येणार आहे.
रेल्वे प्रवाशांचा पत्ता तिकीट आरक्षणात हवाच
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 2:50 AM