नवी दिल्ली : कोळशाअभावी राज्यातील अनेक वीजनिर्मिती संच बंद पडल्याचे आणि अनेक राज्यांत वीजटंचाईची शक्यता असल्याचे वृत्त येताच राजधानी दिल्लीत खळबळ उडाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोळसा मंत्री, ऊर्जामंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांची सोमवारी घाईघाईने बैठक बोलावली. कोळशाची टंचाई बिकट असून त्याचा वीज निर्मितीवर परिणाम होईल, असे चार दिवसांपूर्वी सांगणाऱ्या आर. के. सिंग यांनी आज मात्र कुठेही वीजटंचाई निर्माण होणार नाही, असा दावा केला. कोळसा मंत्री प्रल्हादभाई जोशी यांनीही देशात कोळशाची टंचाई नाही, असे ठामपणे सांगितले.महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब, दिल्ली, आंध्र प्रदेश आदी राज्यांनी कोळशाचा पुरवठा पुरेसा नसल्याच्या तक्रारी केंद्राकडे केल्या होत्या. वीज पुरवठा बंद झाला, तर उद्योगधंदे बंद होतील, असेही या राज्यांनी कळविले होते. त्याची केंद्राने लगेचच दखल घेतली. कोणत्याही राज्याला कोळसा कमी पडू देणार नाही आणि वीजटंचाईही भासू देणार नाही, असे दोघा मंत्र्यांनी अमित शहा यांच्याकडील बैठकीत स्पष्ट केले.
५०० मेगावॅटचा संच आजपासून सुरू होणारमुंबई : राज्यात सरासरी दोन दिवस पुरेल इतकाच कोळसासाठा असल्याचे महानिर्मितीचे म्हणणे आहे. उपलब्धतेत वाढ होऊन लवकरच परिस्थिती पूर्ववत होईल, अशी अपेक्षाही आहे. त्यांच्या एकूण पाच बंद वीजनिर्मिती संचांपैकी भुसावळचा ५०० मेगावॅटचा संच मंगळवारपासून सुरू होईल. कोळसासाठ्यात ४ ऑक्टोबरपासून सुधारणा होऊ लागली आहे. सरासरी दररोज एक लाख मेट्रिक टन इतक्या कोळशाची आवक सुरू होती. त्यात आता वाढ होत आहे.