नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आधारच्या अधिकृतपणावर शिक्कामोर्तब केल्यानंतर सत्ताधारी भाजप आणि आधार योजना आणणाऱ्या काँग्रेस पक्षामध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. महत्वाचे म्हणजे आधार योजनेला भाजपने सत्तेत नसताना विरोध केला होता. आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्य़ा निकालांवरून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये टीका सुरु झाली आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर टीका करताना म्हटले आहे की, काँग्रेससाठी आधार हे सक्षमीकरणाचा मार्ग होता. भाजपासाठी अत्याचार आणि नजर ठेवण्यासाठीचे हत्यार होते. काँग्रेसच्या दूरदृष्टीचे समर्थन करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाचे आभार.
यावर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी टीका करताना म्हटले आहे की, आधारची कल्पना काँग्रेसने आणली खरी पण त्यांना पुढे काय करायचे याची कल्पनाच नव्हती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.
यानंतर काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटरवरून मोदी सरकारवर टीका करण्यात आली आहे. मोदी सरकारद्वारे बेकायदा पद्धतीने आधारमधील वैयक्तीक माहिती इतरांना वाटण्यावर बंदी आणल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे आभार माऩतो. पंतप्रधान मोदी देशवासियांच्या खासगी माहितीच्या चोरीचे उत्तर द्यावे आणि त्यांच्या माहितीची सुरक्षा कशी करणार हेही सांगावे, जे सरकारने आमच्याकडून आधीच घेतली आहे.