बिहारच्या पश्चिम चंपारणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आधार कार्डवर असलेल्या अंगठ्याच्या ठशामुळे 7 वर्षांनंतर दोन मुलं त्यांच्या पालकांकडे परत आली आहेत. सर्व प्रयत्न करूनही शिकारपूर पोलिसांना नरकटियागंजच्या प्रकाशनगर नया टोला येथून सात वर्षांपूर्वी 21 जून 2016 पासून बेपत्ता झालेल्या भाऊ आणि बहिणीचा शोध घेता आला नाही आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही ते सापडले नाहीत. पण, अंगठ्याच्या ठशांवरून कुटुंबीयांचा शोध लागला आणि मुलांचा ठावठिकाणाही सापडला.
बहीण कौशकी आणि तिचा भाऊ राजीव कुमार उर्फ इंदरसेन हे दोघेही नरकटियागंज येथून बेपत्ता झाले होते. त्यावेळी त्याची आई सुनीता देवी यांनी शिकारपूर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या प्रकरणात सुनीताने एका महिलेने आपल्या मुलांना गायब केल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यावेळी पोलियांनी याचा शोध घेतला. पण खूप प्रयत्न करूनही ती मुले सापडली नाहीत.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले. त्यावेळी मुलगी सुमारे 12 वर्षांची होती आणि मुलगा सुमारे 9 वर्षांचा होता. कुटुंबीयांनी गोरखपूर, दिल्ली ते कोलकाता प्रत्येक एनजीओ आणि त्यांच्या स्तरावर शोध घेतला. मात्र मुलं कुठेच सापडली नाहीत. इकडे लखनौच्या बालगृहात राहणाऱ्या अंजलीला नववीत प्रवेश घेण्यासाठी आधार कार्डची गरज होती. अशा परिस्थितीत संस्थेने मुलीचे आधार कार्ड बनवण्यासाठी अंजलीच्या अंगठ्याचा ठसा घेतला तेव्हा तिची ओळख उघड झाली. त्यानंतर असं समोर आलं की अंजलीचं आधार कार्ड आधीच बनलं आहे आणि तिचं नाव कौशकी होतं.
लखनौ येथील बालसुधारगृहात राहणाऱ्या दोन भाऊ-बहिणींचा शोध लागल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर संस्थेने शिकारपूर पोलिसांशी संपर्क साधला, शिकारपूर पोलीस तेथे पोहोचले तेव्हा कौशकी भेटली जी आता अंजली झाली होती. ती त्यांच्यासोबत नरकटियागंजला पोहोचली. सहावीत शिकणारा भाऊ राजीवची परीक्षा सुरू असल्याने तो आला नाही. घरी येऊन तिच्या कुटुंबीयांना भेटल्यानंतर अंजली खूप आनंदी आहे आणि कुटुंबही आनंदी आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.