नवी दिल्ली: भारतातील प्रत्येक नागरिकासाठी 'आधार कार्ड' अतिशय महत्वाचे डॉक्युमेंट आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) 1.32 अब्ज भारतीयांच्या नोंदी असलेल्या आधार डेटाचे संरक्षण करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही. मात्र, त्यानंतरही या डेटाच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होतात. आता UIDAI ने आपल्या सिस्टममधील संभाव्य त्रुटी शोधण्यासाठी हॅकर्सची मदत घेण्याचे ठरवले आहे. यासाठी एक बग बाउंटी प्रोग्राम सुरू केला आहे, ज्या अंतर्गत टॉप 20 हॅकर्सची निवड केली जाईल आणि त्यांना आधार सिस्टममधील बग शोधण्याचे काम दिले जाईल.
आधार डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी अशा पद्धतीची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. एथिकल हॅकर्स जागतिक स्तरावर आघाडीच्या संस्थांसाठी हेच काम करतात. मीडिया रिपोर्टनुसार, 20 वेगवेगळ्या हॅकर्स किंवा गटांना जगातील सर्वात मोठा डिजिटल डेटाबेस असलेल्या UIDAI च्या सेंट्रल आयडेंटिटी डेटा रिपॉझिटरी (CIDR) चा अभ्यास करण्याची संधी दिली जाईल. यामध्ये 1.32 अब्ज भारतीयांचा आधार डेटा संग्रहित आहे.
हॅकर्ससाठी अटी आणि नियमहॅकर्सच्या निकषांबाबत UIDAI ऑर्डरमध्ये असे नमूद केले आहे की, निवडलेला उमेदवार हॅकरऑन, बगक्रॉड सारख्या टॉप 100 बग बाउंटी लीडर बोर्डमध्ये असावा. किंवा Microsoft, Google, Facebook आणि Apple इत्यादी नामांकित कंपन्यांद्वारे चालवल्या जाणार्या बाउंटी प्रोग्राममध्ये सूचीबद्ध असावा. हॅकर्स या निकषांची पूर्तता करत नसल्यास, तो कुठल्याही बग बाउंटी प्रोग्राममध्ये सक्रिय असला पाहिजे.
भारतीय उमेदवार असणे आवश्यक आहेआदेशानुसार, या निकषांच्या आधारे निवड झाल्यानंतर अर्जदाराला UIDAI सोबत करार करावा लागेल. यामध्ये तो सरकारी सूचनांचे पालन करेल आणि कोणत्याही परिस्थितीत माहिती उघड करणार नाही. या आदेशाबाबत एक विशेष गोष्ट म्हणजे UIDAI ने म्हटले आहे की, हे 20 हॅकर्स भारतीय नागरिक असले पाहिजेत आणि त्यांच्याकडे वैध आधार क्रमांक असणे आवश्यक आहे.