Adhir Ranjan Chowdhury: "आमच्याकडे 700 आमदार, तृणमूलचं काय?", ममता बॅनर्जींच्या टीकेवर काँग्रेस नेत्याचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 12:35 PM2022-03-13T12:35:08+5:302022-03-13T12:41:08+5:30
Adhir Ranjan Chowdhury on Mamata Banerjee: विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवानंतर ममता बॅनर्जींनी काँग्रेसवर शेलक्या शब्दात टीका केली होती. त्यावर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींनी पलटवार केला आहे.
नवी दिल्ली: 10 मार्च रोजी उत्तर प्रदेशासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल (Assembly Election Result) लागला. त्या निकालात पाचपैकी चार राज्यात भारतीय जनता पक्षाने (BJP) सत्ता राखली, तर पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने(AAP) काँग्रेसचा(Congress) दारुण पराभव केला. त्यानंतर आता काँग्रेसवर जोरदार टीका होत आहे. संपूर्ण देशात फक्त दोन राज्यात काँग्रसचे सरकार आहे. काँग्रेसच्या या पराभवानंतर राजकारण चांगलेच तापले असून, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
'काँग्रेसने विश्वासार्हता गमावली'
माध्यमांशी बोलताना ममतांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. ''मला वाटते की, भाजपशी लढण्यास इच्छुक असलेल्या सर्व राजकीय पक्षांनी एकत्र काम करायला हवे. काँग्रेसने त्यांची विश्वासार्हता गमावली, त्यांच्यावर आता अवलंबून राहण्यात काहीही अर्थ नाही. काँग्रेसचा सर्वच ठिकाणी दारुण पराभव होत आहे, त्यांना जिंकण्यात काडीमात्र रस दिसत नाही'', अशी खोचक टीका ममतांनी केली होती.
Why are you making remarks against Congress? If Congress didn't exist then people like Mamata Banerjee would not have been born. She should remember this. They went to Goa to please BJP, they made Congress lose. You weakened Congress in Goa, everyone knows this: AR Chowdhury pic.twitter.com/8Yy8LfgAci
— ANI (@ANI) March 12, 2022
काँग्रेस नेत्याचा ममतांवर पलटवार
ममतांच्या टीकेनंतर काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांनी पलटवार केला. 'ममता बॅनर्जी भाजपच्या एजंट आहेत. संपूर्ण भारतभर काँग्रेसला मोठा पाठिंबा आहे. विरोधकांच्या एकूण मतांपैकी 20 टक्के मते एकट्या काँग्रेसकडे आहेत. ममतांनी विसरू नये की, काँग्रेसमधूनच ममता आणि तृणमूलचा जन्म झाला आहे. आजही राष्ट्रीय राजकारणात काँग्रेसशिवाय पर्याय नाही. राष्ट्रीय राजकारणात तृणमूल काँग्रेसचे स्थान कुठे आहे?'' असा सवाल चौधरी यांनी केला.
'आमच्याकडे 700 आमदार'
अधीर रंजन पुढे म्हणाले की, ''वेड्या लोकांना उत्तर देण्यात काही अर्थ नाही. संपूर्ण भारतात काँग्रेसचे 700 आमदार आहेत. ममतांकडे आहेत का तिवढे आमदार? विरोधी पक्षांच्या एकूण मतांपैकी 20 टक्के मते काँग्रेसकडे आहेत. दीदींकडे आहे का? भाजपला खूश करण्यासाठी आणि त्यांचे एजंट म्हणून काम करण्यासाठी दीदी असे बोलत आहेत. तिकडे गोव्यामध्येही तृणमूलने भाजपसाठी काम केले. तृणमूल नसते, तर गोव्यात आज आमची सत्ता आली असते. त्यामुळे भाजपविरोधातील आघाडी काँग्रेसशिवाय होऊच शकत नाही'', असेही चौधरी म्हणाले.