Adhir Ranjan Chowdhury on Droupadi Murmu: अधीर रंजन चौधरींकडून द्रौपदी मुर्मुंचा राष्ट्रपत्नी म्हणून उल्लेख; संसदेत प्रचंड गदारोळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 11:57 AM2022-07-28T11:57:32+5:302022-07-28T12:03:04+5:30
Adhir Ranjan Chowdhury on Droupadi Murmu: गुरुवारी संसदेचे कामकाज सुरु होताच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी चौधरींविरोधात मोर्चा उघडला. काँग्रेस पक्ष आदिवासी महिलेचा सन्मान सहन करू शकत नाहीय, असे त्या म्हणाल्या.
काँग्रेसचे लोकसभेतील खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मुंचा राष्ट्रपत्नी असा उल्लेख केल्याने लोकसभेमध्ये गोंधळ उडाला आहे. भाजपाने काँग्रेसवर टीका करण्यास सुरुवात केली असून चौधरी यांनी माफी मागण्याची मागणी केली आहे. काही भाजपा नेत्यांनी चौधरी यांचे वक्तव्य माफी मागण्या लायक नसल्याचे म्हटले आहे.
गुरुवारी संसदेचे कामकाज सुरु होताच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी चौधरींविरोधात मोर्चा उघडला. काँग्रेस पक्ष आदिवासी महिलेचा सन्मान सहन करू शकत नाहीय, असे त्या म्हणाल्या. द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत एका व्हिडीओमध्ये बोलताना राष्ट्राची पत्नी असा शब्द प्रयोग चौधरी यांनी केला होता. यावरून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील टीका केली आहे. या साऱ्या गदारोळामुळे संसदेचे कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.
#WATCH | "There is no question of apologising. I had mistakenly said 'Rashtrapatni'...the ruling party in a deliberate design trying to make mountain out of a molehill," says Congress MP Adhir R Chowdhury on his 'Rashtrapatni' remark against President Murmu pic.twitter.com/suZ5aoR59u
— ANI (@ANI) July 28, 2022
माफी मागण्याच्या मागणीवरून अधीर रंजन चौधरी यांनी माझ्याकडून चुकून राष्ट्राची पत्नी असा शब्द निघाला. एकदा चूक झाली तर मी काय करू? यावरून मला फासावर लटकवायचे असेल तर लटकवा, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर सोनिया गांधी यांनी चौधरी यांनी माफी मागितल्याचे म्हटले आहे.
राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून जेव्हापासून त्यांच्या नावाची घोषणा झालीय तेव्हापासून द्रौपदी मुर्मू काँग्रेस पक्षाच्या द्वेषाची आणि उपहासाची लक्ष्य झाल्या आहेत. काँग्रेसने त्यांना कठपुतळी असे देखील संबोधले आहे. एक आदिवासी महिला देशाच्या सर्वोच्च पदाला शोभेशा आहेत, हे सत्य अजून काँग्रेसला स्विकारता आलेले नाही, अशी टीका इराणी यांनी केली.