नवी दिल्ली: देशाच्या विकास दरावर टीका करत असताना काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना निर्बला संबोधल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उडाली होती. तसेच भाजपाकडून देखील तात्काळ माफी मागावी अशी मागणी करण्यात येत होती. यानंतर अधीर रंजन चौधरी यांनी आज संसदेत निर्मला सीतारामन माझ्या बहिणीसारख्या असल्याचे सांगत माफी मागितली आहे.
अधीर रंजन चौधरी म्हणाले की, निर्मला सीतारामन माझ्या बहिणीसारख्या आहेत. तसेच मी त्यांचा भावासारखा असून माझ्या बोलण्याने त्यांना दुखावले असेत तर मी त्यांची जाहीर माफी मागतो असं सांगत वादावर पडदा टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना निर्मला या नावाच्या जागी निर्बला का म्हणू नये, असा मनात कधी कधी विचार येत असल्याचे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते. तसेच तुम्ही मंत्री पदावर तर आहात पण जे तुमच्या मनात आहे ते कधी सांगू शकता की नाही, अशी शंकाही उपस्थित केली होती.
देशाचा सकल घरगुती उत्पादन दर हा 4.5 टक्क्यांवर आला आहे. यामध्ये पहिल्या तिमाहीच्या तुलनेत 0.5 टक्क्यांची घरण झाली आहे. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत हाच दर 2.6 टकक्यांनी घसरला आहे. यामुळे केंद्रातील मोदी सरकारवर टीका होत आहे. त्यातच उद्योगपती बजाज यांनी केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत उद्योगपती खरे बोलायला घाबरत असल्याचे वक्तव्य़ केले होते. यावरून मंदीच्या खाईत असलेल्या उद्योगक्षेत्रातील खदखद यावेळी व्यक्त झाली होती.