नवी दिल्ली - मुंबईमध्ये ड्रग्स प्रकरणात (Mumbai Drugs Case) मुलगा आर्य़न खान (Aryan Khan) याला अटक झाल्याने बॉलिवूड स्टार शाहरूख खानच्या (Shahrukh Khan) अडचणीत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे देशात लखीमपूर खिरी हिंसाचारावरून राजकीय वातावरण तापलं आहे. याच दरम्यान आता काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी याबाबत एक सवाल उपस्थित केला आहे. तसेच आर्यन खानच्या अटकेवरून जोरदार निशाणा साधला आहे. ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला अटक करताना मोठी तत्परता दाखवली गेली होती. परंतु, लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणाच्या कारवाईदरम्यान मात्र या तत्परतेचा अभाव दिसला, अशी जोरदार टीका अधीर रंजन चौधरी यांनी केली आहे.
अधीर रंजन चौधरी (Adhir Chowdhury) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स केले आहेत. "आर्यन खानला दंडनीय गुन्ह्याअंतर्गत कठोर शिक्षा दिली जाऊ नये. काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला देखील ताब्यात घेऊन तुरुंगात डांबण्यात आलं होतं. आता आर्यन खानवर ही पाळी आली आहे" असं चौधरी यांनी म्हटलं आहे. तसेच भारतीय संविधानात सर्वांसाठी समान न्याय असल्याचं नमूद करून अधीर रंजन चौधरी यांनी एक मागणी केली आहे.
अधीर रंजन चौधरी यांनी "ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करताना दाखवण्यात आलेली तत्परता लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणाच्या कारवाईदरम्यान मात्र दिसली नाही. ज्यात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राने निर्दोष आंदोलक शेतकऱ्यांना आपल्या वाहनाने अत्यंत क्रूर पद्धतीने चिरडल्याचा आरोप आहे. हे आश्चर्यकारक आहे" असं देखील म्हटलं आहे.
आर्यन खान याचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे त्याची रवानगी आर्थर रोड कारागृहात
कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी अटकेत असलेला, बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे त्याची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली आहे. कारागृहाच्या क्वारंटाइन सेलमध्ये त्याला ठेवण्यात येणार असल्याचे कारागृह अधीक्षक नितीन वायचल यांनी सांगितले. एनसीबीच्या पथकाने शनिवारी ऑक्टोबरच्या रात्री कॉर्डेलिया क्रूझवर छापा मारून आर्यन खान याच्यासह आठ जणांना ड्रग्ज आणि रोख रकमेसह अटक केली होती. त्यानंतर एनसीबीने याप्रकरणात आणखी 10 आरोपींना अटक केली आहे. आर्यन खान याच्यासह सुरुवातीला अटक करण्यात आलेल्या आठही आरोपींना न्यायालयाने गुरुवारी दिलासा देत न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र, आरोपींच्या कोरोना चाचण्या पूर्ण झालेल्या नसल्याने गुरुवारी रात्री त्यांना एनसीबी कार्यालयात न्यायालयीन कोठडीत ठेवले होते