नवी दिल्ली: उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या (UP Election 2022) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिक तापताना पाहायला मिळत आहे. अनेकांनी पक्ष बदलण्यास सुरुवात केली आहे. अलीकडेच काँग्रेसच्या रायबरेलीच्या आमदार अदिती सिंह यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, या पक्षांतरावर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी नाराज असल्याचे सांगितले जात आहे. तसेच जे भ्याड आहेत तेच लोक काँग्रेस सोडत आहेत, अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली होती. यावर, प्रियंका गांधी प्रत्येक गोष्टीत राजकारण करतात, शेतकऱ्यांशी त्यांना काही देणे-घेणे नाही, असा पलटवार अदिती सिंह यांनी केला आहे.
जे भ्याड आहेत तेच लोक काँग्रेस सोडत आहेत, असे प्रियंका गांधी म्हणतात. मात्र, यातून त्या संपूर्ण भारत भ्याड असल्याचे बोलत आहेत, असा टोलाही अदिती सिंह यांनी लगावला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधताना अदिती सिंह यांनी काँग्रेस आणि प्रियंका गांधी यांच्यावर जोरदार टीका केली.
मतदारसंघाच्या विकासासाठी काम करत राहणार
माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी काम करत राहीन, असे अदिती सिंह यांनी सांगितले. यावेळी पत्रकारांनी प्रियंका गांधी यांनी केलेल्या विधानाबाबत विचारले असता, याचा अर्थ त्या संपूर्ण भारत भ्याड लोकांचा देश आहे असे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रियंका गांधी यांच्याविरोधात प्रचार करणार असल्याचे अदिती सिंह यांनी सांगितले. तसेच काँग्रेस पक्ष सोडणारी मी पहिली महिला नाही. आता काँग्रेसमध्ये उरलेच कोण आहे? काँग्रेसच्या धोरणांमध्येच खूप कमतरता आहेत. त्यामुळेच लोक पक्ष सोडून जात आहेत, अशी टीकाही अदिती सिंह यांनी केली.
मी प्रामाणिकपणे काम करेन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यामुळे खूप प्रभावित झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात प्रामाणिकपणे काम करेन. माझा विचार सदर मतदारसंघातूनच निवडणूक लढण्याचा आहे. मात्र, पक्षाचे वरिष्ठ जो निर्णय घेतील त्यानुसार मी काम करेन, असेही अदिती सिंह म्हणाल्या.