चंद्रयान-३ च्या यशानंतर काही दिवसांतच इस्रोने अंतराळ संशोधन क्षेत्रात आणखी एका महत्त्वाकांक्षी मोहिमेच्या दिशेने यशस्वी पाऊल टाकले आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने आखलेल्या मोहिमेतील आदित्य एल-१ या यानाने श्रीहरिकोटा येथी सतीश धवन अंतराळ केंद्रावरून सकाळी ११. वाजून ५० मिनिटांनी अंतराळात यशस्वीरीत्या झेप घेतली. पीएसएलव्ही सी-५७ च्या मदतीने आदित्य एल-१ सूर्याच्या दिशेने झेपावले आहे.
आदित्य एल-१ हे काही काळ पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण केल्यानंतर सूर्याच्या दिशेने झेप घेणार आहे. अंतराळात सुमारे १२५ दिवस प्रवास केल्यानंतर हे यान सूर्याजवळच्या लंग्राज-१ पॉईटवर पोहोचणार आहे. हा पॉईंट सूर्यापासून १५ लाख किमी अंतरावर आहे. आदित्य एल-१ अंतराळात लंग्राज-१ पॉईटवरून सूर्याचा अभ्यास करणार आहे. पृथ्वी आणि सूर्यामधील अंतर हे तब्बल १५ कोटी किमी एवढं प्रचंड आहे. त्यापैकी, एक टक्का अंतर कापून आदित्य एल-१ यान एल-१ बिंदूवर जाईल.
सूर्याचा कुठल्याही अडथळ्याविना अधिक जवळून अभ्यास करण्यासाठी आदित्य एल-१ ही मोहीम इस्रोने हाती घेतली आहे. आदित्य एल-१ वर इस्रोने ७ उपकरणे ठेवली असून, ती सूर्याशी संबंधित अनेक रहस्ये उलगडण्याचे काम करणार आहे. सौर वादळे येण्याचे कारण काय आहे आणि सौर लहरींचा पृथ्वीच्या वातावरणावर काय परिणाम होतो हे देखील अभ्यासले जाणार आहे.