Aditya-L1 (Marathi News) इस्रोने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मोठा इतिहास रचला आहे. इस्रोने सुर्याच्या अभ्यासासाठी पाठविलेले आदित्य एल१ उपग्रह निश्चितस्थळी पोहोचले आहे. एल१ म्हणजेच लैग्रेंज पॉईंट १ (एल १) जवळ हॅलो कक्षेमध्ये आदित्य एल १ आज पोहचलं आहे. यामुळे इस्रोला मोठं यश मिळालं आहे.
पृथ्वीपासुनचे आदित्यचे हे अंतर सुर्यापासूनच्या पृथ्वीच्या एकूण अंतराच्या केवळ १ टक्के एवढे आहे. या कक्षेतून सुर्याच्या उष्णतेपासून दूर राहत सुर्याच्या हालचालींवर लक्ष ठेवता येते. आता पृथ्वीपासून भारतातील पहिल्या सौर वेधशाळेचे अंतर १५ लाख किमी आहे. ४०० कोटी रुपयांचे हे मिशन आता भारतासह संपूर्ण जगाच्या उपग्रहांचे सौर वादळांपासून संरक्षण करेल.
आदित्यचा प्रवास २ सप्टेंबर २०२३ रोजी सुरू झाला होता. पाच महिन्यांनंतर, ६ जानेवारी २०२४ रोजी संध्याकाळी, हा उपग्रह एल१ पॉइंटवर पोहोचला. या बिंदूभोवतीचा सौर प्रभामंडल कक्षेत तैनात करण्यात आला आहे. आदित्य-एल१ उपग्रहाचे थ्रस्टर्स हॅलो ऑर्बिटमध्ये ठेवण्यासाठी काही काळ चालू करण्यात आले. यात एकूण १२ थ्रस्टर्स आहेत. आदित्य एल१ मध्ये सात पेलोड्स बसवण्यात आले आहेत. यामधील चार पेलोड्स हे थेट सूर्याचा अभ्यास करणार आहेत. तर उर्वरित तीन हे वातावरणाचा अभ्यास करतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विट-
इस्रोच्या या कामगिरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत आनंद व्यक्त केला आहे. भारताने आणखी एक टप्पा पूर्ण केला. भारताची पहिली सौर वेधशाळा आदित्य एल१ हे उपग्रह निश्चितस्थळी पोहोचले आहे. आमच्या शास्त्रज्ञांनी अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या अंतराळ मोहिमा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम केले. त्याचेच हे यश आहे. संपूर्ण देश या कामगिरीसाठी शास्त्रज्ञांचे अभिनंदन व्यक्त करत असताना मी देखील त्यात सामील होत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आम्ही मानवतेसाठी विज्ञानाच्या नवीन सीमा पार करत राहू, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.
आदित्य एल१ चे उद्दिष्ट काय?
सौर वातावरणाची गतिशीलता समजून घेण्यासाठी, सूर्याच्या कोरोनाची उष्णता, सौर भूकंप किंवा सूर्याच्या पृष्ठभागावरील 'कोरोनल मास इजेक्शन' (CMEs), सौर वादळांशी संबंधित क्रियाकलाप आणि त्यांची वैशिष्ट्ये आणि पृथ्वीच्या जवळच्या अंतराळातील हवामानविषयक समस्या आदी जाणून घेणे हे या आदित्य एल१ चे उद्दिष्ट आहे.