अहमदाबाद ( Marathi News ): सूर्याच्या अभ्यासासाठी पाठविण्यात आलेले भारताचे आदित्य-एल१ हे यान येत्या ६ जानेवारी रोजी आपल्या निर्धारित लॅग्रेंजियन बिंदूवर (एल१) पोहोचेल. हे स्थान पृथ्वीपासून १.५ दशलक्ष किलोमीटर अंतरावर आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इसरो) चेअरमन एस. सोमनाथ यांनी ही माहिती दिली. २ सप्टेंबर रोजी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून या यानाचे प्रक्षेपण झाले होते.
‘विज्ञान भारती’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘भारतीय विज्ञान संमेलना’च्या पार्श्वभूमीवर सोमनाथ यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले की, एल१ बिंदूवर पोहोचल्यावर आम्ही एक इंजीन सुरू करू. त्यामुळे यान आणखी पुढे जाणार नाही. एल१ बिंदूवरच राहून ते फिरत राहील. त्या ठिकाणी ते पुढील ५ वर्षे राहील.