Aditya Thackeray on Train Accident : झारखंडमधील जमशेदपूरमध्ये पहाटेच्या सुमारास भीषण रेल्वे अपघात झाला. झारखंडमधील चक्रधरपूर रेल्वे विभागातील बारांबो रेल्वे स्थानकाजवळ हावडा-मुंबई मेल एक्स्प्रेसचे सर्व डबे रुळावरून घसरले. या अपघातात आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी झालेत. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रेल्वे अपघाताच्या घटना समोर येत आहेत. विरोधकांकडून झारखंडमधील घटनेवरूनही रेल्वे मंत्र्यांवर निशाणा साधला जात आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर टीका केली आहे.
पहाटे पावणेचारच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. ट्रेन क्रमांक १२८१० हावडा सीएसएमटी एक्सप्रेस ही चक्रधरपूर डिव्हीजनमधील राजखरसावां जंक्शनजवळ रुळावरून घसरली. हा अपघात इतका भीषण होता की दोन प्रवाशांचे मृतदेह ट्रेनच्या बाथरूममध्ये अडकले. रेल्वेचा डबा कापून मृतदेह बाथरूममधून बाहेर काढण्यात आला. या अपघातानंतर अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. आमदार आदित्य ठाकरे यांनी या घटनेवरुन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर निशाणा साधला.
"मला गाड्यांबद्दल माहिती नाही, पण रेल्वेमंत्र्यांकडे नक्कीच काही तरी कवच आहे, ज्यामुळे त्यांच्या कार्यकाळात इतके रेल्वे अपघात होऊनही त्यांना पदावरुन हटवले गेले नाही. दर आठवड्याला काही ना काही अपघात घडतात, मात्र कारवाई होत नाही. त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी निवडणुकीसाठी महाराष्ट्र भाजपचे 'राजकीय प्रभारी' मंत्री करण्यात आले आहेत. त्यांनी मंत्रालयावर लक्ष केंद्रित करायला नको का?," असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, हावडा-मुंबई मेल एक्स्प्रेसच्या काही बोगी रुळावरून घसरल्या आणि जवळच उभ्या असलेल्या शेजारी उभ्या असलेल्या मालगाडीला धडकल्या. हा अपघात झाला तेव्हा ट्रेन ताशी १२० किलोमीटर वेगाने जात होती. या अपघातात ३० हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. जखमींना चक्रधरपूर येथील रेल्वे रुग्णालयात आणण्यात आलं आहे. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत.