भाजपाचे खासदार रमेश बिधूडी यांच्या विधानानं वाद चिघळला आहे. खासदार रमेश बिधूडी यांनी संसदेत चर्चेदरम्यान केलेले वादग्रस्त विधान लोकसभेच्या कामकाजाच्या रेकॉर्डमधून हटवण्यात आले असले तरी यावरून विरोधक सरकारला लक्ष्य करत आहेत. खरं तर लोकसभेत बहुजन समाज पक्षाचे खासदार दानिश अली यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल भाजपाने पक्षातील खासदार रमेश बिधूडी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. याआधी लोकसभा अध्यक्षांनी नाराजी व्यक्त करत त्यांच्या वर्तनावर कठोर कारवाईचा इशारा दिला होता. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपावर सडकून टीका केली.
आपल्या लोकशाहीच्या मंदिरात एखाद्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणार्या व्यक्तीकडून अशा घाणेरड्या वर्तनासाठी केवळ इशारा दिला जातो, ही खरोखरच लाजिरवाणी गोष्ट असल्याचे ठाकरेंनी सांगितले. तसेच सरकारच्या विरोधात बोलणारा विरोधी सदस्य असता तर त्या सदस्याला निलंबित केले असते, आणि बरेच काही, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला.
आदित्य ठाकरेंची टीका आदित्य ठाकरेंनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत म्हटले, "सत्य हे आहे की, हे फक्त भाषेबद्दल नाही, ही वृत्ती आहे. आज ते एका धर्मासाठी बोलले आहेत, उद्या ते कोणत्याही राजकीय विरोधकांसाठी बोलतील. ते आमच्या देशासाठी किंवा माझ्या धर्मासाठी बोलत नाहीत, ते त्यांच्या राजकीय मानसिकतेसाठी बोलत आहेत."
रमेश बिधूडी यांच्या विधानावरून वाद भाजपा खासदार रमेश बिधूडी संसदेच्या विशेष अधिवेशनातील चौथ्या दिवशी लोकसभेमध्ये चांद्रयान-३ च्या यशावर बोलत होते. तेव्हा खासदार दानिश अली यांनी काही टिप्पणी केली होती. त्यावर रमेश बिधूडी संतप्त झाले. तसेच त्यांनी लोकसभेमध्ये दानिश अली यांच्याविरोधात वादग्रस्त शब्दांचा वापर केला. मात्र, आता लोकसभेच्या कामकाजातून त्यांच्या वक्तव्यातील वादग्रस्त भाग हटवण्यात आला आहे. तसेच लोकसभा अध्यक्षांकडे रमेश बिधूडी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. वाद वाढल्यानंतर रमेश बिधूडी यांच्या वक्तव्यातील वादग्रस्त भाग सभागृहाच्या कामकाजातून हटवण्यात आला आहे.