नवी दिल्ली : महाराष्ट्राचे पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवारी दिल्लीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. सीएए, जेनएयूतील वादंगावरून काँग्रेसने बोलावलेल्या विरोधकांच्या बैठकीला शिवसेनेचे नेते गैरहजर राहिले होते. त्यामुळे निर्माण झालेला गैरसमज दूर करण्यासाठीच आदित्य ठाकरेंनीराहुल गांधींची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महत्त्वाच्या मुद्यांवर त्यामुळे शिवसेना-काँग्रेस महत्त्वाच्या मुद्यावर एकत्र येण्याची शक्यता आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांंचीही आदित्य यांनी भेट घेतली. गेले दोन दिवस आदित्य ठाकरे दिल्लीत होते.
महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेनंतर पहिल्यांदाच दोघा नेत्यांची भेट झाली. आदित्य ठाकरे भेटीसाठी राहुल गांधी यांच्या निवासस्थानी गेले होते. महाराष्ट्रातील सरकारच्या कामकाजाविषयी राहुल गांधी यांनी आदित्य यांच्याकडून माहिती घेतली. राज्यातील पर्यावरणाचे प्रश्न, मुंबईला स्वतंत्र विकास निधी आदी प्रश्नांचा केंद्र सरकारकडे एकत्रपणे पाठपुरावा करण्यावर दोघांत चर्चा झाली.फेसबुक, इन्स्टाग्राम कार्यालयातही गेलेसरकार स्थापनेआधी आदित्य ठाकरे यांनी सोनिया गांधी यांनी भेट घेतली होती. मात्र, तेव्हा राहुल यांच्याशी भेट झाली नव्हती. ‘रायसीना डॉयलॉग’साठी आल्याने आदित्य ठाकरे यांनी राहुल यांची भेट घेतल्याची माहिती शिवसेना नेत्याने दिली. आदित्य यांनी फेसबुक व इन्स्ट्राग्रामच्या भारतातील मुख्यालयालाही भेट दिली.