दादरा नगर-हवेली:
दादरा नगर-हवेलीच्या लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमुळे शिवसेना आणि भाजप यांच्यामुळे रंगत प्राप्त झाली आहे. शिवसेना आणि भाजपानं दादरा नगर हवेलीत प्रचाराचा धुरळा उडवला आहे. दोन्ही पक्षांचे बडे नेते दादरा-नगर हवेलीत प्रचारासाठी येत आहेत. यातच शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवारी सिल्वासा येथे शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता टीका केली.
दादरा नगर-हवेलीत कालच देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा उमेदवाराचा प्रचार केला होता. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी आपल्या आजच्या भाषणात फडणवीसांवर निशाणा साधला. "काल इथं महाराष्ट्रातून कोणी येऊन गेलं. त्यांनी गाजर वाटप केलं असेल. त्यांनी याआधीही महाराष्ट्रासाठी एवढे कोटी दिले, तेवढे दिले असं सांगत फिरले आहेत. पण आम्ही इथं पक्ष वाढविण्यासाठी आलेलो नाही. आमची न्यायाची लढाई आहे. डेलकर कुटुंब असेल दादरा नगर-हवेली असेल यांच्यासाठी आमची न्यायाची लढाई आहे", असं आदित्य ठाकरे म्हणाले.
"मी कलाबेन आणि अभिनव यांच्याशी बोललो. त्याचीपण हीच भावना आहे. इथं जनतेवर हुकूमशाही सुरू आहे आणि ती मोडून काढायची आहे. शिवसेना नेहमीच हुकूमशाहीविरोधात लढत आली आहे. त्यामुळेच शिवसेना डेलकर कुटुंबीयांसोबत ठामपणे उभी आहे", असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या आपल्या भाषणात शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला होता. शिवसेना संधीसाधू पक्ष असून मोदींच्या नावावर ५६ जागा मिळवल्या आणि काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेले. महाराष्ट्राचे सरकार खंडणीखोर आहे. ते वसुली करतात. असे लोक तुम्हाला इथंही हवेत का?, असा खोचक सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला होता.