डाऊन सिंड्रोम पीडित अवनीश वडिलांसोबत सर करणार माउंट एव्हरेस्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 11:58 AM2022-04-13T11:58:59+5:302022-04-13T12:00:11+5:30
Mount Everest: अवनीशला लहानपणापासूनच डाऊन सिंड्रोम आहे. डाऊन सिंड्रोमला वैद्यकीय परिभाषेत 'ट्रायसोमी 21' (Trisomy 21) असे म्हणतात.
भोपाळ : इंदूरमधील (Indore) रहिवासी असलेले आदित्य तिवारी (Aditya Tiwari) हे आपला मुलगा अवनीशसोबत एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी तयार झाले आहेत. अवनीश फक्त 7 वर्षांचा आहे आणि त्याला आदित्य तिवारी यांनी 2016 मध्ये दत्तक घेतले होते.
याबाबत आदित्य तिवारी सांगतात की, अवनीश 2016 पासून माझ्यासोबत आहे. मला जनजागृती करायची आहे की, अपंग अनाथ मुले देखील कोणत्याही प्रकारचे यश मिळवू शकतात. तसेच, माउंट एव्हरेस्ट (Mount Everest) सर करण्यासाठी गेल्या 6 महिन्यांपासून प्रशिक्षणावर विशेष लक्ष देत असल्याचे आदित्य तिवारी यांनी सांगितले. याशिवाय, अवनीशला सहानुभूती किंवा असहायतेचा सामना करावा लागू नये अशी माझी इच्छा आहे, असेही ते म्हणाले.
MP: Indore's Aditya Tiwari all set for trek to Mount Everest with his son Avnish with Down syndrome
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) April 13, 2022
He's been with me since 2016. I want to spread awareness that special orphan children can also achieve; have been focusing on his training for 6 months for this trek, Aditya said pic.twitter.com/3hzPj0WBK6
अवनीशला आहे डाऊन सिंड्रोम
अवनीशला लहानपणापासूनच डाऊन सिंड्रोम आहे. डाऊन सिंड्रोमला वैद्यकीय परिभाषेत 'ट्रायसोमी 21' (Trisomy 21) असे म्हणतात. हा आजार जन्मजात किंवा गर्भधारणेच्या काळापासून बालकांमध्ये असतो. हा एक अनुवांशिक विकार आहे जो मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर परिणाम करतो. दरवर्षी सुमारे 6 हजार बालकांना या विकाराचा त्रास होतो.
डाऊन सिंड्रोमची कारणे
डाऊन सिंड्रोम हा अनुवंशिक गुणसूत्रीय असंतुलनामुळे निर्माण होतो. परंतु तो एका पिढीकडून दुस-या पिढीकडे संक्रमित होतोच असे नाही. गर्भधारणेच्या काळामध्ये गुणसूत्रीय विभाजनात दोष निर्माण झाल्यास हा आजार होऊ शकतो.
डाऊन सिंड्रोमची लक्षणे
नवजात अर्भकांध्ये वेगवेगळ्या लक्षणांवरून हा आजार निर्माण झाल्याचे दिसून येते. जसे, काही मुले जन्मतःच शारीरिक व्यंग घेऊन जन्माला आलेली असतात. काही मुले जन्मल्यानंतर वारंवार निळसर पडू लागतात. त्यांना मातेचे स्तनपान करण्यास अडथळा निर्माण होतो. तसेच ह्रदयाचे ठोकेही अनियिमत असू शकतात. काही नवजात बालकांमध्ये थायररॉइडचे प्रमाण रक्तनमुना चाचण्यांमध्ये आढळून येते. तर काही बालकांमध्ये आतड्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाल्याचे आढळून येते. त्यामुळे स्तनपानाची समस्या किंवा शौचाला होण्याची समस्या भेडसावते. आतडे व अन्ननलिका यांच्यातील जन्मजात सदोषतेमुळे हे घडते.