नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांच्यावर निवडणूक आयोगाने आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाईचा बडगा उगारला आहे. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीतयोगी आदित्यनाथ यांना तीन दिवसांची प्रचारबंदी घातली आहे. तर मायवती यांना दोन दिवसांच्या प्रचारावर बंदी घातली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान योगी आदित्यनाथ आणि मायावती यांनी वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने योगी आदित्यनाथ आणि मायावती यांच्यावर आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला. तसेच, याप्रकरणी योगी आदित्यनाथ यांच्या प्रचार मोहिमेवर पुढील 72 तास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे उद्या (16 एप्रिल) सकाळी 6 वाजल्यापासून योगी आदित्यनाथ निवडणूक प्रचार, रोड शो किंवा मुलाखत अशा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराशी निगडीत कोणत्याही कार्यक्रमात सहभाग घेऊ शकणार नाहीत. याशिवाय, मायावती यांच्यावरही आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाचा ठपका ठेवण्यात आला असून, त्यांना उद्या (16 एप्रिल) सकाळी 6 वाजल्यापासून 48 तास रोड शो किंवा मुलाखत अशा लोकसभा निवडणूक प्रचाराशी संदर्भात गोष्टी करता येणार नाहीत.
दरम्यान, योगी आदित्यनाथ यांच्यावर 9 एप्रिल रोजी मेरठ येथील सभेत वादग्रस्त वक्तव्य करुन आदर्श आचारसंहितेचा भंग केला आरोप होता. तर मायावती यांनी 7 एप्रिल रोजी उत्तर प्रदेशातील सहरानपूर येथील देवबंद येथील प्रचारसभेत वादग्रस्त वक्तव्य करुन, आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती.