नवी दिल्ली : दिल्लीतील जहाॅंगीरपुरीतील अतिक्रमणे हटविण्याच्या मोहिमेला गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यांची स्थगिती दिली आहे. बुधवारी आदेश दिल्यानंतरही उत्तर दिल्ली महापालिकेच्या महापौरांनी अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू ठेवल्याचा कृतीची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे.
हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी दोन गटांत तणाव निर्माण झाल्यानंतर, बुधवारी अचानकपणे उत्तर दिल्ली महापालिकेने उपद्रवग्रस्त भागातील अतिक्रमणे बुलडोझरने हटविण्यात आली.
या कारवाईच्या विरोधात जमाते उलेमा ए हिंद या संघटनेने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. सर्वोच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी करून बुधवारी सकाळी ११ वाजता या कारवाईला स्थगिती दिली. परंतु, त्यानंतरही जवळपास दोन तास ही कारवाई सुरूच होती.
उत्तर महापालिकेच्या या कृतीवर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. न्या. एल. एन. राव व न्या. भूषण गवई यांच्या खंडपीठाने महापौरांना आदेशाची माहिती कळविल्यानंतरही कारवाई सुरू ठेवण्याच्या कृतीची गंभीर दखल घेतल्याचे मत व्यक्त केले. या याचिकेवर पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी होणार आहे.
काँग्रेसच्या नेत्यांना रोखले - जहाॅंगीरपुरी भागात गुरुवारी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला जाण्यापासून रोखण्यात आले.- दिल्ली प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष चौधरी अनिल कुमार व माजी केंद्रीय मंत्री अजय माकन यांनी जहाॅंगीपुरीत जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यांना आधीच रोखले.- काँग्रेसने नेहमीच गरिबांचा कैवार घेतला आहे. त्यांच्या हक्कासाठी काँग्रेस लढा देईल, असेही माकन म्हणाले.