प्रशांत माने
कल्याण : कोरोनावर मात करण्यासाठी अद्याप कोणतीही लस विकसित झालेली नाही. रुग्ण बरे करण्यासाठी विविध प्रकारच्या औषधांचा वापर डॉक्टरांकडून सुरू आहे. पण, सध्याची परिस्थिती पाहता प्लाझ्मा थेरपी कोरोनावर अत्यंत उपायकारक ठरत असली, तरी ही थेरपी देण्यासाठी केडीएमसीकडे तज्ज्ञ डॉक्टर आणि कुशल कर्मचारी नाहीत. विशेष म्हणजे, केडीएमसीने लाखो रुपयांचे मानधन देण्याबाबतच्या जाहिराती देऊनही तज्ज्ञ डॉक्टर महापालिकेकडे फिरकलेले नाहीत. तर, दुसरीकडे खाजगी रक्तपेढ्यांना इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चची (आयसीएमआर) परवानगी नसल्याने त्यांनाही या तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर बंधने आली आहेत. परिणामी, कल्याण-डोंबिवलीतील कोरोना रुग्ण प्लाझ्मा थेरपीपासून वंचित आहेत.केडीएमसी हद्दीत आतापर्यंत एकूण २० हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर, ३७७ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण चांगले असले तरी सध्या प्रतिदिन नऊ ते दहा रुग्णांचा मृत्यू होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे खाजगी रुग्णालये रुग्णांची आर्थिक पिळवणूक करत आहेत. ती थांबविण्यासाठी केडीएमसीने खाजगी रुग्णालयांवर वॉच ठेवला असला, तरी इंजेक्शनच्या दरात अव्वाच्या सव्वा वाढ करून काळाबाजार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे प्रकारही नुकतेच उघडकीस आले. त्यावर अंकुश ठेवणे शक्य झाले नसताना दुसरीकडे टोकलिझुमॅब यासारख्या महागड्या इंजेक्शनपेक्षा कमी खर्चात होणाऱ्या प्लाझ्मा थेरपीकडे मात्र स्थानिक यंत्रणेचे दुर्लक्ष झाले आहे.
कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी एक प्रयोगात्मक प्रक्रिया आहे. या उपचारपद्धतीत कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आलेल्या व्यक्तीच्या रक्तातून प्लाझ्मा काढून तो कोरोनावर उपचार घेणाºया रुग्णास दिला जातो. यामुळे रुग्णामध्ये प्रतिकारशक्ती वाढून तो बरा होतो. परंतु, कल्याण-डोंबिवलीत मनपा प्रशासन कुशल तंत्रज्ञाअभावी ही थेरपी राबवू शकलेली नाही. या अटी-शर्तींची पूर्तता करू शकत नसल्याने आयसीएमआरने प्लाझ्मा थेरपीसाठी केडीएमसीला परवानगी दिलेली नाही. दुसरीकडे खाजगी रक्तपेढ्यांचीही तीच अवस्था आहे. महापालिका हद्दीतील प्रमुख रक्तपेढ्यांशी संपर्क साधला असता त्यांनीही आयसीएमआरची परवानगी नसल्याने आम्ही कोरोना रुग्णांना प्लाझ्मादान करू शकत नसल्याचे स्पष्ट केले.
सुशिक्षितांच्या शहरात तज्ज्ञ डॉक्टरांची वानवाकल्याण-डोंबिवलीची गणना सुशिक्षित शहरांमध्ये होते. परंतु, येथील महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची वानवा नेहमीच प्रकर्षाने जाणवते. सध्या कोरोनाच्या काळातही हे चित्र कायम आहे. परिणामी, कोरोना रुग्णांसाठी वरदान ठरणारी प्लाझ्मा थेरपी प्रक्रिया राबविता येत नाही, ही नामुश्कीची बाब आहे.
अडीच लाख देऊनहीडॉक्टरांचा प्रतिसाद नाहीप्लाझ्मा थेरपी राबविण्यासाठी कुशल डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासणार आहे. परंतु, आपल्याकडे तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव आहे. वारंवार जाहिराती देऊनही डॉक्टर मिळत नाहीत. अडीच लाख प्रतिमहिना मानधन मिळेल, अशी जाहिरात देऊनही एकाही डॉक्टरने अर्ज केलेला नाही. त्यामुळे तज्ज्ञांची कमतरता असल्याने आपल्याकडे थेरपी राबवू शकत नाही.- डॉ. सुरेश कदम, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी, केडीएमसी
परवानगीसाठी प्रयत्न सुरूप्लाझ्मा थेरपीसाठी परवानगी मिळण्याकरिता आयसीएमआरकडे आमचे प्रयत्न सुरू आहेत. प्लाझ्मा थेरपीसाठी आय.जी.जी. पातळी महत्त्वाची असते. त्या आय.जी.जी टेस्टिंगची परवानगी आम्हाला आयसीएमआरने दिली आहे. ही परवानगी मिळविणारी डोंबिवली आयएमए ही पहिली संस्था आहे. प्लाझ्मा थेरपीसाठी परवानगी मिळाली, तर पुढील प्रक्रियांची पूर्तता करून थेरपी राबविली जाईल.- डॉ. मंगेश पाटे,सदस्य, राष्ट्रीय कोविड टास्क फोर्स
आयसीएमआरने अनेक राज्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना प्लाझ्मा थेरपी देण्यासाठी परवानगी दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही प्लाझ्मादानासाठी कोरोनातून बरे झालेल्यांनी पुढे यावे, असे आवाहन केले आहे.