नुकत्याच हरयाणात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत प्रशासनाने आपला पराभव करण्याचा प्रयत्न केला. तसेच जीवे मारण्याचे षडयंत्र रचले, असा दावा हरयाणात सरकारमधील कॅबिनेट मंत्री अनिल विज यांनी केला आहे. एका आयोजित कार्यक्रमात त्यांनी हा दावा केला. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनिल विज यांनी हरयाणात विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केले. यावेळी ते म्हणाले, "प्रशासनाने अनिल विज यांना हरवण्यासाठी सर्व प्रयत्न केले. प्रशासनाला माझा पराभव करायचा होता. प्रशासनाने हा प्रकार कोणाच्या सांगण्यावरून केला, हा तपासाचा विषय आहे. मी थेट आरोप करत नाहीये... रक्तपात घडवण्याचा प्रयत्न झाला. अनिल विज यांचा जीव गेला म्हणजे निवडणूक बरबाद होईल."
दरम्यान, हरयाणात विधानसभा निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री राहिलेले ७१ वर्षीय अनिल विज यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या निवडणुकीत अंबाला कँट मतदारसंघातून अनिज वीज हे ७२७७ मतांनी विजयी झाले होते. काँग्रेसने अंबाला कँट मतदारसंघातून कुमारी शैलजा यांचे निकटवर्तीय परविंदर सिंग परीला उमेदवारी दिली होती.
अनिल विज यांनी केला होता मुख्यमंत्रीपदावर दावा हरयाणात भाजपने निवडणूक जिंकण्यापूर्वीच अनिल विज यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला होता. भाजपचेच सरकार स्थापन होईल आणि पक्षाला हवा तो मुख्यमंत्री होईल. पक्षाला माझी इच्छा असेल तर पुढची बैठक तुमच्यासोबत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी होईल. मी पक्षात सर्वांपेक्षा वरिष्ठ आहे, असे ते म्हणाले होते.
बहुमताने भाजप सरकार स्थापनदरम्यान, हरयाणात गेली १० वर्षे सत्तेत असलेल्या भाजपने यावेळी पूर्ण बहुमताने सरकार स्थापन केले आहे. भाजपने ४८ जागा जिंकल्या आहेत, तर काँग्रेसने ३७ जागा जिंकल्या आहेत.याशिवाय, दोन जागा इंडियन नॅशनल लोकदलाच्या खात्यात गेल्या आहेत.