नवी दिल्ली - केंद्रीय आरोग्य आणि कुटंब कल्याण मंत्रालयाने पौष्टीक आहाराला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात मंत्रालायाच्या वतीने स्वत:पासून करण्यात येत आहे. त्यानुसार आगामी काळात आरोग्य विभागांच्या बैठकीत बिस्कीट आणि फास्टफूडऐवजी उकडलेले चणे, बादाम आणि अक्रोडसारखे पदार्थ अधिकाऱ्यांना खाण्यासाठी ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. या संदर्भात आरोग्य विभागाने सर्कुलर काढले आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने म्हटले की, केंद्रीय आरोग्यमंत्री खुद्द डॉक्टर आहेत. त्यामुळे त्यांना फास्टफूडच्या सेवनाने होणाऱ्या दुष्परिणामांची कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी प्रशासकीय बैठकीतून बिस्कीट आणि फास्टफूड हटविण्याचे आदेश दिले आहे. केंद्रीय आरोग्य आणि बाल कल्याण मंत्रालयाचा भार हर्षवर्धन यांच्याकडे आहे.
यापूर्वी आरोग्य मंत्रालयाने बैठकांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्या वापरण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचे स्वागत दुसऱ्या मंत्रालयाने देखील केले होते. त्यामुळे इतर विभागांच्या बैठकांमध्ये काचाचे जार आणि रिसायकल होणारे ग्लास पाणी पिण्यासाठी वापरले जातात. त्यामुळे यापुढे दुसऱ्या मंत्रालयांच्या बैठकांमध्ये देखील अधिकाऱ्यांसाठी बिस्कीटांऐवजी बदाम आणि अक्रोड खाण्यासाठी ठेवले जावू शकतात.