नवी दिल्ली - परदेशातील विद्यापीठांच्या धर्तीवर भारतातील विद्यापीठे आणि उच्चशिक्षण संस्थांमध्ये आता वर्षातून दोनदा प्रवेश मिळणार आहे. याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) परवानगी दिली आहे. २०२४-२५ च्या शैक्षणिक सत्रापासून याबाबतची अंमलबजावणी केली जाणार असून, जुलै-ऑगस्ट आणि जानेवारी-फेब्रुवारी अशा दोन वेळा प्रवेश प्रक्रिया राबविल्या जातील, अशी माहिती यूजीसीचे प्रमुख जगदेश कुमार यांनी दिली.
भारतीय विद्यापीठांत वर्षातून दोनदा प्रवेश मिळाल्यास त्याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना होईल. बोर्डाच्या परीक्षांच्या निकालांस झालेला उशीर, आरोग्य समस्या किंवा वैयक्तिक कारणांमुळे ज्या विद्यार्थ्यांना जुलै-ऑगस्टच्या सत्रात विद्यापीठात प्रवेश घेता आला नाही, त्यांना जानेवारी-फेब्रुवारीच्या सत्रात प्रवेश घेता येईल. द्विवार्षिक प्रवेशामुळे महाविद्यालयांना मनुष्यबळ, साधनसामग्रीचे नियोजन करता येईल. विविध विद्याशाखा, प्रयोगशाळा, वर्गखोल्या आणि सहायक सेवा अधिक कार्यक्षमतेने देता येईल. परिणामी, विद्यापीठात चांगले शैक्षणिक वातावरण तयार होईल, असे कुमार म्हणाले.
आंतरराष्ट्रीय सहकार्यास मदत जगभरातील विद्यापीठे आधीपासूनच द्विवार्षिक प्रवेश प्रणालीचे पालन करतात. भारतातील संस्थांनी द्विवार्षिक प्रवेश पद्धती स्वीकारल्यास त्या आंतरराष्ट्रीय सहयोग आणि विद्यार्थी देवाणघेवाण वाढवू शकतात. त्यातून जागतिक स्पर्धात्मकता वाढेल व जागतिक शैक्षणिक मानकांशी जुळवून घेता येईल, असेही कुमार म्हणाले.
द्विवार्षिक प्रवेश बंधनकारक नाहीविद्यापीठे व उच्चशिक्षण संस्थांना द्विवार्षिक प्रवेश देणे बंधनकारक असणार नाही. ज्यांच्याकडे आवश्यक पायाभूत सुविधा आणि अध्यापन वर्ग आहे, ते या संधीचा उपयोग करू शकतात. ज्यांना उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये नवीन अभ्यासक्रम उपलब्ध करायचे आहे, त्यांना ही चांगली संधी आहे, असे कुमार म्हणाले.
वर्षभर वाट पाहावी लागणार नाही द्विवार्षिक विद्यापीठ प्रवेशामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे मनोधैर्य टिकवून ठेवण्यास मदत होईल. कारण एकदा प्रवेश चुकल्यास त्यांना प्रवेशासाठी आखणी एक वर्ष प्रतीक्षा करावी लागणार नाही, तसेच उद्योगांना त्यांची कॅम्पस भरती वर्षातून दोनदा करता येईल, त्यामुळे पदवीधरांना रोजगाराच्या अधिक संधी मिळतील, असेही कुमार यांनी सांगितले.