नवी दिल्ली - परदेश दौऱ्यादरम्यान बऱ्याचदा भारतीय कलाकारांना अपमानास्पद वागणुकीचा सामना करावा लागतो. शाहरुख खानपासून ते इरफान खानपर्यंत कित्येक कलाकारांचा आतापर्यंत परदेशी विमानतळावर अपमान करण्यात आला आहे. अशाच पद्धतीच्या अपमानकारक वागणुकीचा सामना आता बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक अदनान सामी यांनाही करावा लागला आहे. अदनान सामी व त्याच्या टीमला कुवेतमध्ये अपमानास्पद वागणूक मिळाल्याचे वृत्त समोर आले आहे. अदनान सामी आणि त्याचे सहकारी एका कार्यक्रमासाठी कुवेतला गेले होते. कुवेत विमानतळावर माझ्या टीमला भारतीय कुत्रे म्हणून संबोधण्यात आले, असा आरोप अदनान सामी यांनी केला आहे.
'आम्ही तुमच्या शहरात प्रेम घेऊन आलो होतो. आमच्या भारतीयांनी आम्हाला सन्मानाची वागणूक दिली, मात्र तुमच्याकडून कोणत्याही पाठिंबा मिळाला नाही. कुवेत विमानतळावरील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी कारण नसताना माझ्या टीमला तुच्छ लेखत भारतीय कुत्रे म्हणून हिणवले. कुवेतींची इतक्या उद्धटपणे वागण्याची हिंमतच कशी झाली?' असे म्हणत अदनानने ट्विटरवर आपला संताप व्यक्त केला आहे.परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी अदनानच्या तक्रारीची दखल घेत आपल्याशी संपर्क साधण्याचं आवाहन त्यांनी केलं. त्यानंतर काही वेळातच अदनाननं आपल्याला मदत मिळाल्याचं सांगत सुषमा स्वराज यांचे आभार मानले.