ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - गेल्या १५ वर्षांपासून भारतात राहणारा व पाकिस्तानी नागरिकत्वाचा त्याग करणारा गायक अदनान सामी लवकरच भारतीय नागरिक बनण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार अदनानला भारतीय नागरिकत्व बहाल करण्याचा निर्णय घेण्याची दाट शक्यता असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. मात्र पाकिस्तानी कलाकार, खेळाडूंना तीव्र विरोध करत आंदोलन करणारी शिवसेना यावर काय भूमिका घेते हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यातच अदनानला अनिश्चित कालावधीसाठी भारतात राहण्याची परवानगी दिली होती. २००१ साली एका वर्षाच्या व्हिसासह भारतात आलेल्या अदनाने वेळोवेळी व्हिसाचे नूतनीकरण केले होते. मात्र त्याच्या पासपोर्टची मुदत संपल्यानंतर पाकिस्तानी अधिका-यांनी त्याच्या नूतनीकरणास नकार दिला. त्यानंतर अदनानने गेल्या मे महिन्यात गृहमंत्रालयातील अधिका-यांची भेट घेऊन आपल्याला पाकिस्तानमध्ये पाठवले जाऊ नये अशी मागणी केली. मानवतावादी भूमिकेतून त्याची ही मागणी मान्य झाली होती. कायद्यानुसार विज्ञान, तत्वज्ञान, कला, साहित्य, जागतिक शांतता या क्षेत्रांमध्ये विशेष योगदान देणाऱ्यांना भारतीय नागरिकत्व देण्याची सोय आहे. त्यामुळे आता अदनान सामी लवकरच भारतीय नागरिक बनण्याची शक्यता आहे.