ऑनलाइन लोकमत
राजकोट, दि. 15 - 8 फेब्रुवारी रोजी करण्यात आलेल्या अनाथ मुलाच्या हत्येचा उलगडा झाला आहे. एका एनआरआय महिलेने या मुलाच्या हत्येचा कट रचला होता. गोपाळ अजानी असं या मुलाचं नाव होतं. यासाठी तिने अजून दोघांची मदत घेतली होती. तिघांनी अगोदर एका मुलाला दत्तक घेऊन त्याचा वीमा काढण्याची योजना आखली. त्यानंतर विम्याची रक्कम मिळवण्यासाठी मुलाच्या हत्येचा कट रचला.
केशोड पोलिसांनी तपास केला असता तिघांनी याच कारणास्तव हत्याकांड केल्याचं निष्पन्न झालं आहे. पोलिसांनी आरोपींची नावे जाहीर केली आहेत. 53 वर्षीय महिला आरती धीर, 27 वर्षीय नितीश मुंड आणि कंवलजीत रायजादा अशी या आरोपींची नावे आहेत. नितीश आणि रायजादा दोघेही लंडनमध्ये एकत्र शिकत असून एकाच घरात राहतात. आरती त्यांच्या शेजारी राहत होती. 2015 पासून तिघे मिळून हा कट रचत होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
8 फेब्रुवारी रोजी गोपाळ आपल्या भावोजी हरसुख आणि नितीशसोबत जात असताना त्याच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला. हसमुख यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला असता गोपाळची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. यानंतर आरोपी फरार झाले. गोपाळला रुग्णालयात नेण्यात आलं, पण तोपर्यत त्याचा मृत्यू झाला होता.
पोलिसांनी तपास केल्यानंतर नितीशला अटक केली. रायजादा हरसुख यांच्या संपर्कात राहत असल्याने त्याचाही सुगावा लागला. आई-वडिलांचं निधन झाल्यानंतर गोपाळ हरसुख यांच्यासोबतच राहत होता. गोपाळला दत्तक घेतल्यानंतर 1 कोटी 30 लाखांचा विमा काढण्यात आला होता. त्याची हत्या केल्यानंतर ही रक्कम तिघांमध्ये वाटून घेण्याची योजना होती.