नवी दिल्ली: असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (ADR) मंगळवारी आपली रिपोर्ट जारी केली. यात देशातील खासदारांची सरासरी संपत्ती 38.33 कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. यामध्ये राज्यसभा आणि लोकसभेतील खासदारांचा समावेश आहे. तसेच, खासदारांची एकूण संपत्ती 30 हजार कोटींच्या आसपास असल्याची माहिती रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे.
भाजप खासदारांची संपत्ती 7,051 कोटी रुपये न्यूज एजन्सी आयएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, एडीआरने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले की, लोकसभा आणि राज्यसभेच्या 763 विद्यमान खासदारांची एकूण मालमत्ता 29,251 कोटी रुपये आहे. यातील भाजपच्या 385 खासदारांची एकूण संपत्ती 7,051 कोटी रुपये आहे. ही आकडेवारी निवडणुकीच्या वेळी खासदारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार आहे. या अहवालात खासदारांची सरासरी संपत्ती 38.33 कोटी रुपये असल्याचे म्हटले आहे. गुन्हेगारी प्रकरणे असलेल्या खासदारांची सरासरी संपत्ती 50.03 कोटी रुपये, तर गुन्हेगारी प्रकरणे नसलेल्या खासदारांची सरासरी संपत्ती 30.50 कोटी रुपये आहे.
16 BRS खासदारांची संपत्ती 6,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त भाजपच्या 385 खासदारांची एकूण संपत्ती 7,051 कोटी रुपये आहे, तर बीआरएसच्या 16 खासदारांची एकूण संपत्ती 6,136 कोटी रुपये आहे. तसेच, वायएसआरसीपीच्या 31 खासदारांची एकूण संपत्ती 4,766 कोटी रुपये, काँग्रेसच्या 81 खासदारांची एकूण संपत्ती 3,169 कोटी रुपये आणि आम आदमी पार्टीच्या 11 खासदारांची एकूण संपत्ती 1,318 कोटी रुपये आहे.
या राज्यात सर्वात श्रीमंत खासदार प्रति खासदार सर्वाधिक सरासरी संपत्ती असलेल्या राज्यांमध्ये तेलंगणा आघाडीवर आहे. तेलंगणातील 24 खासदारांची सरासरी मालमत्ता 262.26 कोटी रुपये आहे. आंध्र प्रदेशातील 36 खासदारांची सरासरी मालमत्ता 150.76 कोटी रुपये तर पंजाबमधील 20 खासदारांची सरासरी मालमत्ता 88.94 कोटी रुपये आहे. रिपोर्टनुसार, लक्षद्वीपमधील खासदाराची सरासरी संपत्ती फक्त 9.38 लाख रुपये आहे. त्यानंतर त्रिपुरातील खासदारांची सरासरी संपत्ती 1.09 कोटी रुपये आणि मणिपूरच्या तीन खासदारांची सरासरी संपत्ती 1.12 कोटी रुपये आहे.