नवी दिल्ली- 5 वर्षांत 153 खासदारांची संपत्ती दुप्पट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2014मध्ये संसदेत पोहोचलेल्या 153 खासदारांच्या संपत्तीत 142 टक्क्यांची वाढ झाली आहे. संसदेत पुन्हा निवडून आलेल्या या खासदारांची वर्षं 2009मध्ये 5.50 कोटी एवढी सरासरी संपत्ती होती.यात दुपटीने वाढ झाली असून, ती सरासरी 13.32 कोटीपर्यंत गेली आहे, असा अहवाल इलेक्शन वॉच आणि असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेनं दिला आहे. या यादीत भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा, बीजेडीचे खासदार पिनाकी मिश्रा आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे सर्वात वरच्या स्थानी आहेत. भाजपाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाली आहे. वर्ष 2009मध्ये त्यांची संपत्ती 15 कोटी रुपये होती, जी आता 2014मध्ये वाढून 131 कोटी रुपये झाली आहे. तर बीजू जनता दला(बीजेडी)चे पिनाकी मिश्रा यांची संपत्तीही 107 कोटी रुपयांनी वाढून 137 कोटी रुपये झाली आहे. संपत्तीच्या वाढीमध्ये तिसऱ्या स्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आहेत. 2009मध्ये सुप्रिया सुळे यांची संपत्ती 51 कोटी रुपये होती. ती 2014मध्ये वाढून 113 कोटी झाली आहे. संपत्तीत सर्वाधिक वाढ होणाऱ्या पहिल्या दहा खासदारांमध्ये अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल सहाव्या स्थानी, तर वरुण गांधी 10व्या स्थानी आहेत.पाच वर्षांमध्ये ( वर्षं 2009 ते 2014)153 खासदारांच्या संपत्तीत सरासरी 7 कोटी 81 लाखांची वाढ नोंदवली गेली आहे. वरुण गांधी यांची संपत्ती 2009मध्ये चार कोटी होती. ती आता 2014मध्ये वाढून 35 कोटी झाली आहे. भाजपाच्या 72 खासदारांच्या संपत्तीत 7.54 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तर काँग्रेसच्या 28 खासदारांची संपत्ती 6.35 कोटींनी वाढली आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या वर्ष 2009मध्ये असलेल्या 2 कोटींच्या संपत्तीत वाढ होऊन वर्षं 2014मध्ये ती 7 कोटी इतकी झाली आहे.
5 वर्षांत 153 खासदारांची संपत्ती दुप्पट; सुप्रिया सुळे 'सुस्साट', शत्रुघ्न सिन्हाही 'फॉर्मात'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 11:13 AM