नवी दिल्ली : तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांची मैत्रीण म्हणून परिचित असलेल्या शशिकला नटराजन यांनी शनिवारी अद्रमुकच्या सरचिटणीसपदाचा कार्यभार स्वीकारला. कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना त्यांना गहिवर अनावर झाला. जयललिता यांचे निधन झाल्यामुळे पक्षाचे सरचिटणीसपद रिक्त झाले होते. त्या जागी शशिकल यांची एकमताने निवड करण्यात आली होती. या पदाचा कार्यभार स्वीकारताना त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना उद्देशून भावपूर्ण भाषण केली. जयललिता यांच्या आठवणी जागवताना त्यांना रडू कोसळले. शशिकला म्हणाल्या की, अम्मा (जयललिता) आता आपल्यात नाहीत. त्यांनी ७५ दिवस मृत्यूशी झुंज दिली. मात्र देवाने आपल्या लेकराला आपल्याकडे बोलावून घेतले. अम्मा यांचे त्यांचे कार्य आपल्यासोबत आहे. त्याबळावर आपला पक्ष तामिळनाडूत पुढील १00 वर्षे राज्य करेल. शशिकला म्हणाल्या की, मी २९ वर्षांची होते तेव्हापासून जयललिता यांच्यासोबत होते. जयललिता या माझे जीवनच होत्या. अद्रमुकचे नेतृत्व करताना जयललिता यांनी आखून दिलेल्या मार्गावरूनच मी वाटचाल करीन. पक्षाचे कार्यकर्ते हेच पक्षाचे बळ आहे. कार्यकर्त्यांचा आपणास पाठिंबा मिळत राहील, याचा मला विश्वास आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)एमजीआर यांच्या स्मरणार्थ तिकिटअद्रमुकचे संस्थापक आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन उपाख्य एमजीआर यांच्या जयंतीचे हे शतक महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त यंदा संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातील. एमजीआर यांच्या स्मरणार्थ तिकिट आणि नाणे काढण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली जाईल.अद्रमुकच्या अध्यक्षीय मंडळाचे चेअरमन ई. मधुसुदन, पक्षाचे खजिनदार तथा राज्याचे मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम, ज्येष्ठ नेते तथा लोकसभेचे उपाध्यक्ष एम. थंबीदुराई यांनी शशिकला यांचे स्वागत केले. तसेच ते शशिकला यांना पक्षाच्या कार्यालयात घेऊन गेले. पक्ष सरचिटणीसांच्या कार्यालयात शशिकला यांनी नंतर पनीरसेल्वम, मधुसनन आणि थंबीदुराई यांच्यासोबत बैठक घेतली.
अद्रमुकची सूत्रे शशिकलांकडे
By admin | Published: January 01, 2017 1:39 AM