आमदार, खासदार, मंत्र्यांकडे नागरिक आपल्या विविध प्रश्नांवर समस्या घेऊन जातात. अनेकदा दारुचे गुत्ते, वाईन शॉप बंद करावेत म्हणूनही त्रस्त झालेले लोक जातात. परंतू, मध्य प्रदेशमध्ये एक विचित्रच प्रकार घडला आहे. अख्खीच्या अख्खी बाटली संपवूनही दारु न चढल्याने त्याची तक्रार एका दारुड्याने थेट मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांकडे केली आहे.
या दारुड्याला त्या दारूमध्ये पाणी मिक्स करून विकली जात असल्याचा संशय आला आहे. यामुळे ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी या मद्यपीने केली आहे. पुराव्यासाठी या व्यक्तीने आपल्यासोबत दोन सीलबंद बाटल्या सुरक्षित ठेवल्या आहेत.
उज्जैनच्या बहादुरगंजमध्ये लोकेंद्र सोठिया हा राहतो. त्याला दारुचे व्यसन आहे. त्याने १२ एप्रिलला क्षीरसागर भागात दारुच्या गुत्त्यावरून चार देशी दारुच्या बाटल्या खरेदी केल्या होत्या. घरी येत असताना त्याने त्यातील एक बॉटल संपविली, परंतू त्याला नशाच चढली नाही. यामुळे त्याला संशय आला की या बाटल्यांमध्ये भेसळ केली जात आहे. याची तक्रार त्याने परत त्या दुकानदाराकडे केली, त्याने त्याला धमकी देऊन पिटाळले. तुला जे काही करायचे ते कर असे आव्हान त्या दुकानदाराने दिल्याचे लोकेंद्रचा दावा आहे. यामुळे लोकेंद्रने पार वर पर्यंत याची तक्रार करण्याचे ठरविले.
यानंतर लोकेंद्रने आणखी एक बॉटल संपविली, तेव्हाही तोच अनुभव आला, म्हणून त्याने उरलेल्या दोन बाटल्या पुरावा म्हणून ठेवल्या आहेत. यानंतर त्याने उज्जैन एसपी, गृहमंत्री नरोत्तम मिश्रा आणि अबकारी विभागाकडे ठेकेदाराविरोधात तक्रार दाखल केली आहे. यावर अबकारी विभागाचे रामहंस पचौरी यांनी सांगितले की, अद्याप आमच्याकडे तक्रार पोहोचलेली नाही. मिळाल्यावर तपास करून दोषींवर कारवाई केली जाईल.