ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - बाबरी मशीद उद्धवस्त केल्या प्रकरणी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवणी, उमा भारती आणि मुरली मनोहर जोशी यांच्याविरोधात गुन्हेगारी कारस्थान रचल्याच्या आरोपाखाली खटला चालवण्यात यावा अशी मागणी गुरुवारी सीबीआयने सर्वोच्च न्यायालयाकडे केली. बाबरी प्रकरणात तांत्रिक आधारावर 21 आरोपींविरोधात कारस्थान रचल्याचा आरोप रद्द करण्यात आला आहे. यात अनेक भाजपा नेते आहेत असे सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात सांगितले.
लखनऊ कोर्टात त्यांच्याविरोधात कारस्थान रचल्याच्या आरोपाखाली खटला चालवण्यात आला पाहिजे असे सीबीआयने न्यायालयाला सांगितले. बाबरी प्रकरणी एकूण दोन खटले आहेत. भाजपा नेते आडवणी आणि अन्य विरोधात एका खटला आहे. 6 डिसेंबर 1992 रोजी जेव्हा बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा हे सर्व नेते मंचावर उपस्थित होते. दुसरे प्रकरण लाखो कारसेवकांविरोधात आहे. जे त्यावेळी तिथे होते.
सीबीआयने आडवाणी आणि अन्य 20 जणांविरोधात दोन समुदायांमध्ये तेढ वाढवणे, लोकांना चिथावणी देणे, अफवा पसरवणे, शांतता बिघडवणे या कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. पुढे 120 बी कलमाखाली गुन्हेगारी कारस्थानाचा आरोप विशेष कोर्टाने रद्द केला. उच्च न्यायालयाने विशेष कोर्टाचा हा निर्णय कायम ठेवला.