नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या जुलैैत होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना डावलले असून आता परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुरमू व मुरली मनोहर जोशी यांच्या नावाची चर्चा आहे. लालकृष्ण अडवाणी यांना राष्ट्रपतीपदासाठी डावलण्यात आले आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातील चर्चेनंतर ही नावे पुढे आली. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांनंतर याबाबतचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. मुरलीमनोहर जोशी (८३) हे १९४४ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेले आहेत. अयोध्येत राम मंदिराची मोहीम सुरु असताना १९९१ च्या काळात ते भाजपचे अध्यक्ष होते. वाजपेयी यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये १९९६, १९९८ आणि १९९९ मध्ये ते संसद सदस्य होते. राजकीय कारकिर्दीत त्यांनी कन्याकुमारी ते श्रीनगर एकता यात्रा काढली होती. आणीबाणीत त्यांना तुरुंगवासही झाला होता.
> भाजपाला शोध चांगल्या प्रतीमेचा परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज (६५) यांची दिल्लीच्या एकूणच राजकारणात चांगली प्रतिमा आहे. पण, अलिकडच्या काळात त्यांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. सुमित्रा महाजन (७४) या इंदोरमधून आठ वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत. महाजन या लोकसभेचे अध्यक्षपद भूषवतआहेत. झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुरमू (५९) यांचे नावही अचानक पुढे येऊ शकते. त्या ओडिशातील आदिवासी समूहातून आलेल्या आहेत. १९९७ मध्ये त्यांची ओडिशात विधानसभा सदस्यपदी नियुक्ती झाली होती.
(लोकमत न्यूज नेटवर्क)