लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व डॉ. मुरली मनोहर जोशी यांना मंगळवारी देण्यात आले. विश्व हिंदू परिषद व श्रीराम मंदिर न्यासने ज्येष्ठ नेत्यांच्या घरी जाऊन त्यांना निमंत्रण दिले.
देशभरात श्रीराम मंदिर आंदोलनाचे रणशिंग फुंकणारे व श्रीराम मंदिर उभारण्यासाठी रथयात्रा काढणारे भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांना अयोध्या श्रीराम न्यासचे सरचिटणीस चंपत राय, विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रामलाल यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण दिले. १९८९मध्ये अडवाणी यांनी श्रीराम मंदिर आंदोलन छेडल्याने व देशभर रथयात्रा काढली होती.
विहिंपचे नेते आलोक कुमार म्हणाले की, श्रीराम मंदिर उभारण्यासाठी अडवाणी यांची भूमिका कोणीही विसरू शकत नाही. त्यामुळे त्यांना या सोहळ्यासाठी निमंत्रित केले आहे. डॉ. मुरली मनोहर जोशी हेही आंदोलनाशी अनेक वर्षांपासून जोडले गेलेले आहेत. त्यामुळे त्यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.