नवी दिल्ली : लालकृष्ण आडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंग व उमा भारती यांच्यासह भाजपा व संघ परिवाराशी संबंधित १३ नेत्यांवर अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्याच्या कटकारस्थानात सामील असल्याच्या आरोपावरून फौैजदारी खटला चालणार की नाही याचा अंतिम फैसला सर्वोच्च न्यायालयात नजीकच्या भविष्यात होण्याची शक्यता आहे.दि. ६ डिसेंबर १९९२ रोजी कारसेवकांनी बाबरी मशीद उद््ध्वस्त केल्यानंतर त्यासंबंधीचे दोन खटले लखनऊ आणि रायबरेली येथील फौजदारी न्यायालयात प्रलंबित आहेत. रायबरेली न्यायालयाने खटल्याचे विभाजन करून बाबरी पाडण्यास प्रक्षोभक स्थिती तयार करणे व प्रत्यक्ष वास्तू पाडणे असे दोन खटले केले. आडवाणी, जोशी, उमा भारती, कल्याण सिंग यांच्यासह १३ नेत्यांना कटकारस्थानातून आरोपमुक्त केले. अलाहाबाद उच्च न्यायालयानेही हा निर्णय कायम केला. यानंतर कित्येक वर्षांनी सीबीआयने यास सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. कोर्टाने आडवाणींसह इतर आरोपींना दोन वर्षांपूर्वी नोटिसाही काढल्या. हे प्रकरण सोमवारी न्या. पिनाकी चंद्र घोष व न्या. रोहिंग्टन नरिमन यांच्या खंडपीठापुढे आले, तेव्हा या आरोपींवर काढून टाकलेला कटकारस्थानाचा आरोप पुन्हा ठेवून खटला चालवावा का, यावर २२ मार्चला सुनावणी घेण्याचे ठरविले. (लोकमत न्यूज नेटवर्क)>पुढे काय होणार?कटकारस्थानाचा आरोप काढून टाकण्यास समर्थनीय कारण दिसले नाही, तर हा आरोप पुनरुज्जीवित करून खटला चालविण्याचा आपण आदेश देऊ, असे न्यायालयाने सूचित केले. तसेच लखनऊ व रायबरेली येथील दोन्ही खटले एकत्र करून चालविण्याचाही आदेश दिला जाऊ शकेल, असेही संकेत दिले गेले. तसेच लखनऊ व रायबरेली येथील दोन्ही खटले एकत्र करून चालविण्याचाही आदेश दिला जाऊ शकेल, असेही संकेत दिले गेले. अर्थात, या दोन्ही मुद्द्यांवर आडवाणींसह इतरांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतरच निर्णय होईल. असे असले तरी गेली २४ वर्षे रेंगाळलेल्या या खटल्याची निर्णय स्थिती लवकरच येईल, असे दिसते.>‘सीबीआय’च्या भूमिकेकडे लक्षमुळात ‘सीबीआय’ने हे अपिल करण्याचा विलंबाने निर्णय घेतला तेव्हाची व आताची परिस्थिती वेगळी आहे. हे १३ आरोपी ज्या पक्षाशी व परिवाराशी संबंधित आहेत त्यांच्या हाती आता देशाची सत्ता आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यावर बाबरी पाडण्याच्या कटाचा खटला चालविण्यासाठी ‘सीबीआय’ आता किती आग्रही भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या आरोपींना आरोपमुक्त करण्याविरुद्ध ‘सीबीआय’खेरीज हाजी मेहबूब अहमद या खासगी व्यक्तीनेही अपील केले आहे व त्यात इतर कायदेशीर मुद्द्यांखेरीज ही बदललेली परिस्थितीही अधोरेखित केली गेली आहे.
आडवाणी, जोशींवर टांगती तलवार ?
By admin | Published: March 07, 2017 6:09 AM