लखनऊ : बाबरी मशिदीची वास्तू कारसेवकांनी पाडल्यानंतर २५ वर्षांनी सीबीआय न्यायालयाने लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी व उमा भारती या भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांसह ११ जणांवर गुन्हेगारी कटाचा खटला चालविण्यासाठी आरोपनिश्चिती केली. त्या सर्वांना प्रत्येकी ५०हजार रुपयांचा जामीन मंजूर झाला. न्यायालयाने आधी दिलेल्या आदेशानुसार अडवाणी (८९ वर्षे), जोशी (८३), उमा भारती (५८) व विनय कटियार (६२) या भाजपाच्या नेत्यांखेरीज वयाची ८५ वर्षे ओलांडलेले विश्व हिंदू परिषदेचे विष्णू हरी दालमिया आणि एके काळच्या जहाल वक्त्या साध्वी ऋतंबरा (५३) हे आरोपी न्यायाधीश एस. के. यादव यांच्यापुढे हजर झाले. यानंतर या आरोपींनी आरोपमुक्तीसाठी अर्ज केला. बाबरी पाडण्यात आमचा सहभाग नव्हता. उलट आम्ही जमावाला तसे न करण्याचा प्रयत्न केला होता, असे या नेत्यांचे म्हणणे होते. ते अमान्य करून न्यायालयाने त्यांच्यावर भादवि कलम १२०(बी) अन्वये बाबरी विध्वंस कटाचा आरोप निश्चित केला.याच घटनेशी संबंधित दुसऱ्या खटल्यात आरोपी असलेल्या रामविलास वेदांती, वैकुंठ लाल शर्मा, चंपट राय बन्सल, महंत नृत्य गोपाल दास, धर्मदास आणि सतीस प्रधान या नेत्यांवरही कटाखेरीज अन्य आरोप निश्चित केले.याआधी हे दोन खटले लखनऊ व रायबरेली येथे स्वतंत्रपणे सुरू होते. रायबरेली न्यायालायने अडवाणींसह ११ जणांवरील कटाचा आरोप काढून टाकला होता व अलाहाबाद न्यायालयानेही त्यावर शिक्कामोर्तब केले होते. मात्र सीबीआयने केलेल्या अपिलावर सर्वोच्च न्यायालयाने कटाचा आरोप पुन्हा ठेवण्याचा आणि दोन्ही खटले लखनऊ येथे एकत्रितपणे चालविण्याचा आदेश दिला. लखनऊ न्यायालयास हे खटले दोन वर्षांत संपवून निकाल द्यायचा आहे. (वृत्तसंस्था)भाजपाचे नेते निर्दोष आहेत व ते नक्कीच निष्कलंक ठरतील. आमच्या सरकारने पक्षाच्या या नेत्यांविरुद्धचा खटला काढून घेतला नाही, हेही लक्षात घेण्यासारखे आहे.- एम. व्यंकय्या नायडू
अडवाणी, जोशी, उमा भारती बाबरी विध्वंस कटात आरोपी
By admin | Published: May 31, 2017 4:58 AM