- संतोष ठाकूर नवी दिल्ली : भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भेटणा-या भाजपा व भाजपेतर खासदारांच्या संख्येत अचानक वाढ होताना दिसत आहे. लोकसभेत फक्त दोन जागांच्या बळावर भाजपाला सत्ता मिळवून देण्याचे स्वप्न पाहणारे अडवाणी गेली जवळपास चार वर्षे पडद्यामागेच राहिले, परंतु संसदेच्या पावसाळी अधिवेशनात त्यांचे प्रशंसक आणि इतर राजकीय लोकांची त्यांना भेटण्यासाठी रीघ लागली आहे. एवढेच नाही, तर अडवाणी पहिल्यांदाच आपले चाहते व प्रशंसकांना नाराज न करता त्यांच्यासोबत छायाचित्रे काढून घेण्यास संमती देत आहेत. सामान्यत: अडवाणी यांना छायाचित्रे काढणे फार आवडत नाही.संसदेत नियमितपणे ठीक ११ वाजता हजर होणारे अडवाणी आधी संसद भवनस्थित आपल्या कार्यालयात मोजक्याच लोकांची भेट घ्यायचे. अडवाणी यांनी गेल्या चार वर्षांत भाजपाच्या फक्त खासदारांची भेट घेतली यावरून त्यांनी एकांताला प्राधान्य दिले हेच दिसते. संसदेच्या या अधिवेशनात मात्र हे चित्र बदलले. या अधिवेशनात त्यांना भेटायला येणाºया खासदारांच्या संख्येत खूपच वाढ झाल्याचे नोंद आहे. या अधिवेशनात त्यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे ४८ खासदार भेटले, तर इतर पक्षांचे २७ खासदार वा नेते या काळात अडवाणी यांना भेटण्यास संसदेत आले. त्यात तृणमूल काँग्रेसच्याप्रमुख ममता बनर्जी यांचाही समावेश आहे.अडवाणी यांना भेटायला येणाºयांत जास्त संख्येतील खासदार हे दक्षिण भारतीय होते. अर्थात, याशिवाय बिहार, उत्तर प्रदेशमधीलही काही खासदार भेटून गेले.>मार्गदर्शनाचा लाभ सर्वांनाचभाजपाचा एक नेता म्हणाला की, ते वरिष्ठ नेते आहेत. त्यामुळे खासदार व इतर कार्यकर्ते त्यांना भेटायला येत असतात. यात कोणतेही राजकारण शोधू नये व येत्या निवडणुकीशी त्याचा संबंध जोडला जाऊ नये. ते सक्रिय झाले आहेत हे या नेत्याने मान्य केले. हे पक्षाच्या व कार्यकर्त्यांच्या हिताचे आहे कारण त्यांचे मार्गदर्शन सगळ्यांच्या लाभाचे आहे.
अडवाणी पुन्हा सक्रिय? भेटणाऱ्यांच्या संख्येत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2018 4:58 AM