ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गुरुदक्षिणा मिळण्याची शक्यता आहे. लालकृष्ण आडवाणी भारताचे पुढील राष्ट्रपती बनणार असल्याचं वृत्त आहे. उत्तर प्रदेशसह 5 राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे राज्यसभेतील भाजपाचं संख्याबळ लक्षणीयरीत्या वाढणार आहे. त्यामुळे भाजपाला आपल्या पसंतीचा राष्ट्रपती मिळणार हे नक्की झालंय.
या निवडणुकांचे निकाल येण्याआधी 8 मार्चला सोमनाथमध्ये झालेल्या बैठकीत राष्ट्रपतीपदाबाबत चर्चा झाली. यावेळी नरेंद्र मोदी, अमित शाह आणि स्वतः आडवाणी उपस्थित होते असं वृत्त झी मीडियाने दिलं आहे. उत्तर प्रदेश निवडणुकांचे निकाल येण्याआधी मोदी 2 दिवस गुजरातच्या दौ-यावर होते. यावेळी सोमनाथमध्ये एक विशेष बैठक झाली. या बैठकीत मोदी, शाह, आडवाणी यांच्याशिवाय केशूभाई पटेल हे देखील उपस्थित होते. याच बैठकीत 'जर उत्तर प्रदेश निवडणुकांमध्ये भाजपाला हवे तसे निकाल हाती आले तर गुरु आडवाणी यांना गुरुदक्षिणा देण्याचे संकेत खुद्द मोदींनी दिले होते' असं वृत्त झी मीडियाने दिलं आहे.
सध्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ या वर्षी जुलैमध्ये संपणार आहे. त्यानंतर आडवाणी नवे राष्ट्रपती बनण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
भारताचे तेरावे राष्ट्रपती म्हणून प्रणव मुखर्जींनी 25 जुलै 2012 रोजी सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी शपथ घेतली होती. देशाचे तत्कालीन सरन्यायाधीश एस. एच. कपाडिया यांनी प्रणव मुखर्जींना संसदेतील सेंट्रल हॉलमध्ये पद व प्रतिष्ठेची शपथ दिली. प्रणव मुखर्जींच्या शपथविधीनंतर त्यांना 21 तोफांची सलामी देण्यात आली होती.