मीरत : बाबरी मशीद विध्वंसाला २३ वर्षे लोटूनही भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या पाठीमागचे खटल्याचे शुक्लकाष्ट पुरते संपलेले नाही. बाबरी मशीद पाडण्यात आली त्यावेळी त्याच वास्तूत रामलल्लाचे मंदिर होते. मशिदीसोबतच हे मंदिरही उद्ध्वस्त झाल्यामुळे हिंदू महासभेने आता अडवाणींवर खटला दाखल करण्याची तयारी चालविली आहे.बाबरी मशीद पाडली जात होती तेव्हा भाजपचे अन्य नेते मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती हेही उपस्थित होते, त्यामुळे त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्याचा विचार या संघटनेने बोलून दाखविला आहे. मुस्लिम बांधवांचा सहभाग असल्याखेरीज राम मंदिर बांधले जाऊ शकत नाही, अशी भूमिका हिंदू महासभेने चर्चेच्या वेळी घेतली होती. भाजपच्या नेत्यांनी घुमट पाडण्यासाठी जमावाला चिथावणी दिली होती. मुस्लिम नमाज पडत होते ती जागा या घुमटाखाली नव्हती, मात्र जमावाने संपूर्ण वास्तूच जमीनदोस्त केली होती. याचा अर्थ मंदिर आणि मशीद दोन्ही जमीनदोस्त झाले. यासाठी भाजपच्या नेत्यांना शिक्षा ठोठावलीच गेली पाहिजे. ते हिंदूंचे हितरक्षक असल्याचा दावा करतात; मात्र त्यांनी मंदिरही पाडले आहे, असे अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)
मंदिर विध्वंसाबद्दलही अडवाणींवर खटला
By admin | Published: February 06, 2016 2:52 AM