हैदराबाद : महानगरपालिकेच्या निवडणुकीत ५५ जागा जिंकून तेलंगणा राष्ट्र समिती सर्वात माेठा पक्ष म्हणून समाेर आला आहे. टीआरएसला बहुमत मिळाले नसले तरीही महापालिकेत ‘ॲडव्हाॅन्टेज टीआरएस’ असे चित्र आहे. पदसिद्ध सदस्यांचे मतदान आणि एमआयएमची भूमिका महापाैर निवडीमध्ये महत्त्वाची राहणार आहे. हैदराबादचे महापाैरपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित असून, एमआयएमच्या पाठिंब्याशिवाय टीआरएससमाेर पर्याय नाही.एकूण १५० जागांपैकी टीआरएसने ५५ जागा जिंकल्या आहेत, तर असदुद्दीन ओवैसींच्या एमआयएमने ४४ जिंकतानाच किंगमेकरच्या भूमिकेत आले आहेत. भाजप आणि एमएमआयएम युती शक्य नसली तरी टीआरएसला सत्तास्थापनेसाठी एमआयएमचा पाठिंबा मिळवावा लागणार आहे.
...अशी आहे आकड्यांची जुळवाजुळवहैदराबादमध्ये महापालिकेत १५० नगरसेवक आहेत, तर ५२ पदसिद्ध सदस्यांसह एकूण संख्याबळ २०२ असे आहे. पदसिद्ध सदस्यांमध्ये हैदराबाद महापालिका क्षेत्रातील आमदार आणि खासदारांचा समावेश असताे. त्यांना मतदानाचा अधिकार आहे. महापाैरदाच्या निवडणुकीसाठी १०२ सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे. सत्ताधारी टीआरएसचे यापैकी ३८ सदस्य असून, एमआयएमचे १० आणि भाजपचे दाेन सदस्य आहेत.
ओवैसी यांनी ‘टीआरएस’साेबत तेलंगणावासीयांच्या भावना जुळलेल्या असल्याचे सांगून केसीआर यांना अप्रत्यक्ष संकेत दिला आहे. अद्याप संपूर्ण निकाल निवडणूक आयाेगाने घाेषित केलेले नाहीत, तसेच काेणासाेबत युतीबाबत चर्चा झालेली नसल्याचे ओवैसी यांनी स्पष्ट केले.