लंडन : कोरोनाकाळात शाळा बंद असल्याने ऑनलाइन शिक्षणावरच भर देण्यात आला होता. त्यामुळे मुलांचा स्क्रीन टाइम वाढून त्यातील अनेकांच्या केवळ डोळ्यांवरच नव्हे, तर संपूर्ण प्रकृतीवर परिणाम झाला. या गोष्टी रोखण्यासाठी पालकांनी दक्ष राहावे, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. या अनुषंगाने इंग्लंडमधील अँग्लिया रस्किन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनावर आधारित एक लेख जर्नल ऑफ स्कूल हेल्थ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. त्यात म्हटले आहे की, अधिक वेळ मोबाईल फोन किंवा संगणकाच्या स्क्रीनकडे बघत राहिल्याने लहान मुलांच्या केवळ डोळेच नव्हे, तर प्रकृतीवरही परिणाम होतो. (वृत्तसंस्था)
डिजिटल गॅझेट्सच्या अधिक वापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर अतिशय ताण येतो. त्यांचे डोळे कोरडे होतात. त्यांना धूसर दिसायला लागते. त्याशिवाय मान, खांद्यांमध्ये वेदना होतात. शरीराची फारशी हालचाल होत नसेल व जास्त खाण्याने स्थूलपणा वाढण्याचा धोका असतो. लॅपटॉपवर व्हिडीओ बघताना काही मुले मोबाईलवर, सोशल मीडियावर सक्रिय असतात.
कोरोना साथीच्या काळात लॉकडाऊनमुळे जगातील बहुसंख्य देशांमध्ये ऑनलाइन शिक्षण देण्यात येत होते. त्यावेळी नाइलाजाने पालकांनी आपल्या लहान मुलांच्या हातात डिजिटल गॅझेट्स दिली. ८९% कॅनडामध्ये पालकांची मुले रोज दोन तासांहून अधिक वेळ मोबाईल किंवा संगणकाच्या स्क्रीनकडे पाहतात. जर्मनीमध्ये स्क्रीन टाइम दररोज एक तास इतका आहे.