भुवनेश्वर : इस्राएलच्या तांत्रिक सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या हवेतील लक्ष्याचा जमिनीवरून वेध घेणाऱ्या लांब पल्ल्याच्या अत्याधुनिक क्षेपणास्त्राच्या मंगळवारी दोन चाचण्या घेण्यात आल्या. ़यशस्वी प्रायोगिक चाचण्यांनंतर ही प्रक्षेपणास्त्रे तिन्ही सैन्यदलांमध्ये दाखल होतील. त्यामुळे भारताच्या युद्धसज्जता आणखी मजबूत होईल.बालासोर समुद्रकिनाऱ्यापासून जवळ असलेल्या चांदीपूर-आॅन-सी येथील एकात्मिक प्रक्षेपण तळावरून सकाळी आणि दुपारी अशा दोन वेळा या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. एक काल्पनिक वैमानिकरहीत विमान हल्ल्याच्या टप्प्यात आल्याचे संकेत संलग्न राडार यंत्रणेने देताच क्षेपणास्त्र तळावरून झेपावले आणि त्याने लक्ष्याचा वेध घेतला. सामरिकदृष्ट्या हे सर्व किती अचूकतेने पार पडले, याचे तांत्रिक निष्कर्ष लगेच समजू शकले नाहीत.भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) आणि इस्राएल एअरोस्पेस इंडस्ट्रिज (आयएआय) यांनी संयुक्तपणे ही अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणा विकसित केली असून तिची पूर्णपणे जोडणी करून प्रथमच चाचणी घेण्यात आली. यात प्रत्यक्ष क्षेपणास्त्राखेरीज लक्ष्याचा अचूक वेध घेऊन त्यानुसार क्षेपणास्त्राची मार्गनिश्चिती करणारी बहुद्देशीय ‘सर्व्हेलन्स अॅण्ड थ्रेट अॅलर्ट राडार सिस्टिम’ (एमएफ-स्टार) राडार यंत्रणाही आहे.या चाचणीच्या वेळी खबरदारीचा उपाय म्हणून प्रक्षेपण तळाच्या २.५ किमी परिसरात राहणाऱ्या सुमारे ३,५०० गावकऱ्यांचे जिल्हा प्रशासनाने तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये स्थलांतर केले. तसेच चाचणी पूर्ण झाल्याचा संदेश मिळेपर्यंत बालासोर, भद्रक आणि केंद्रपाडा या किनारी जिल्ह्यांतील मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचाही इशारा देण्यात आला. (वृत्तसंस्था)>गुणवैशिष्ठ्ये आणि उपयोग>माऱ्याचा पल्ला: ६० ते ८० किमी.कोणत्याही संभाव्य हवाई धोका हाणून पाडण्याची क्षमता.क्षेपणास्त्रावरील स्फोटके-६० किलो.एकूण वजन: २.७ टनवेग: २ मॅच (प्रति सेकंद १ किमी)संरक्षणदलांची संवेदनशील आस्थापने व गर्दीच्या शहरांच्या हवाई संरक्षणासाठी प्रभावी.
हवाई लक्ष्यवेधी क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी
By admin | Published: September 21, 2016 6:34 AM