बंगळुरू - गेल्या ५ दिवसापासून बंगळुरूत एरो इंडिया शो सुरू आहे. एयरो इंडिया २०२३ मध्ये तिन्ही सैन्यदलासाठी नव्या तंत्रज्ञानावर भर देण्यात आला आहे. यात जेटपॅक सूट आकर्षणाचं केंद्र ठरतंय. याचं वैशिष्टे म्हणजे हा सूट परिधान केल्यानंतर जवान जेट बनू शकतो. गॅस टर्बाइन इंजिनने चालणारा हा सूट घातल्यानंतर जवान १० ते १२ मीटर हवेत उडू शकतात. त्याचसोबत सर्व वातावरणात हा सूट काम करेल. जेटपॅक सूट घालून भारतीय जवान हवेत उडत शत्रूला सडेतोड उत्तर देऊ शकतात.
या सूटचं वजन ४० किलोग्रामपर्यंत आहे. यात अशी सिस्टिम आहे ज्याने जवान हवं असेल तेव्हा उडू शकतात आणि जमीनीवर येऊ शकतात. जेटपॅक सूट घालून ५० किमी प्रति तास वेगाने हवेने ८ मिनिटांपर्यंत उडू शकतात. भारतीय सैन्यदल हे जेटपॅक खरेदी करणार असून त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बंगळुरूतील राघव रेड्डी यांनी यावर काम केले आहे.
हा सूट गॅस अथवा इंधनाने चालतो. त्यात टर्बाइन इंजिन असते. त्याचे हातात कंट्रोल असते. जेटपॅक सूटमुळे डोंगरात, जंगलात सीमाभागात लक्ष ठेवता येऊ शकते. परंतु हा सूट घालून जवान केवळ हवेत उडू शकतो. कारण त्याच्या दोन्ही हातात कंट्रोल असतो. या सूट परिधान करून कुठल्याही प्रकारचा हल्ला करता येणे शक्य नाही. परंतु भविष्यात यात हवे ते बदल करून जवानाला हल्ला करण्यास सक्षम असतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.
एरो शोमध्ये कर्नल कुमार धरमवीर म्हणाले की, युद्धाच्या परिस्थितीत लष्कराचे ग्राउंड आणि एअर घटक एकत्र काम करतात तेव्हा समन्वय आवश्यक असतो. यासाठी लष्कराच्या मिलिटरी इंजिनिअरिंग युनिटने खास त्रिशूल लिंक सिस्टीम तयार केली आहे. ज्याद्वारे जमिनीवर सैनिक आणि आकाशात हेलिकॉप्टर आणि ड्रोन यांच्यात समन्वय प्रस्थापित करता येईल. तर सीमेवर देखरेख आणि घुसखोरांना रोखण्यासाठी सैन्याने सॉफ्टवेअर अग्नि डी तयार केले आहे. ही सिस्टम सीमेवर कॅमेरे आणि ड्रोनसह काम करते. येणाऱ्या काळात लडाख सीमेवर हे तैनात करण्यात येणार आहे असं कॅप्टन विकास त्रिपाठी म्हणाले.